सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : आयपीएलचा थरार संपला असून आरसीबीने पहिल्यांदा आयपीएल टायटल जिंकले आहे. आता टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी भारतीय संघ 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. २० जूनपासून दोन्ही देशांदरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. अशा परिस्थितीत ही मालिका एका नवीन युगाची नंदी असणार आहे. पण आता या मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या दोघांची या मालिकेत एंट्री झाली आहे. जाणून घेऊ नक्की प्रकरण काय आहे.
२० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीबीसी स्पोर्टच्या अहवालानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे नाव बदलण्यात आले असून आता दोन्ही देशांच्या दोन महान खेळाडूंच्या नावावर या मालिकेच्या ट्रॉफीचे नाव असणार आहे. या अहवालात म्हटले आहे की इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे नाव माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये या ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार आहे. ज्याला तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असे म्हटले जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यावेळी या ट्रॉफीला सादर करण्यात येण्याची शक्यता आहे. तथापि, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अद्याप याबाबत घोषणा केलेली नाही. ट्रॉफीच्या अनावरणाच्या वेळी तेंडुलकर आणि अँडरसन उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच, चाहत्यांना या दोन दिग्गजांच्या हस्ते मालिका जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.