दीप्ती शर्माला(फोटो-सोशल मीडिया)
Deepti Sharma suffers a setback in the T20 rankings : आयसीसीकडून नुकतीच महिला क्रिकेटसाठी नवीनतम टी २० क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला मोठा फटका बसला आहे. शर्माला एका स्थाना नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँडने दीप्ती शर्माला पिछाडीवर टाकत आयसीसी महिला गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सदरलँड यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये अव्वल स्थानी विराजमान झाली होती.
दीप्ती शर्माला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तिला दुसऱ्या स्थानावर जावे लागले आहे, तर पाकिस्तानची सादिया इक्बाल तिसऱ्या स्थानावर गेली आही. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन आणि लॉरेन बेल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. जॉर्जिया वेअरहॅम, वेस्ट इंडिजची चार्ली डीन आणि नाशरा संधू यांनी प्रत्येकी एक स्थानाने पुढे सरकले असून अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर जाऊन पोहोचल्या आहेत. या यादीमध्ये, भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर पाच स्थानांनी घसरून ११ व्या स्थानी गेली आहे.
भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीला पाच स्थानांचा फायदा होऊन ती ४७ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे. श्रीलंकेची कविशा दिलहारी एका स्थानाने पुढे सरकून ३२ व्या स्थानी पोहचली आहे आणि चामारी अटापट्टू तीन स्थानांनी पुढे सरकून ४८ व्या स्थानावर विराजमान झाली आहे. तसेच, भारताची अरुंधती रेड्डी २१ स्थानांनी पुढे सरकून ४४ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे.
फलंदाजांच्या यादीमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला फायदा झाला आहे. कौरला दोन स्थानांचा फायदा होऊन ती १३ व्या स्थानावर पोहोचली आहे. विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद ६९ धावांची खेळी साकारणाऱ्या कौरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर तिला पुढील दोन सामन्यांमध्ये २६ आणि ९ धावाच करता आल्या होत्या. आता हरमनप्रीतला टॉप १० मध्ये स्थान मिळवण्याची नामी संधी असणार आहे.
तसेच, अमनजोत कौरने सात स्थानांची उडी घेत चढून संयुक्तपणे ७८ व्या स्थानावर येऊन पोहोचली आहे, तर श्रीलंकेच्या फलंदाज हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी यांनी अर्धशतके झळकावल्यानंतर मोठी झेप घेण्यात यश मिळवले आहे. हसिनी परेरा ४२ चेंडूत ६५ धावा काढत ३१ स्थानांनी वर चढून ४० वे स्थान पटकावले आहे. तर इमेशा दुलानी ७७ स्थानांनी वर चढून ८४ व्या स्थानी पोहोचली आहे.






