विनू मंकड(फोटो-सोशल मिडिया)
Birthday special : भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांचा आज जन्मदिन आहे. १२ एप्रिल १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला आहे. विनू मंकड यांचे पूर्ण नाव मूलवंतराय हिम्मतलाल मंकड असे आहे. २१ ऑगस्ट १९७८ रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी विनू मंकड यांनी मुंबई येथे शेवटचा श्वास घेतला होता. ते भारतातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. त्या काळात त्यांनी शानदार कामगिरी साध्य केली होती. मंकड हे पहिले खेळाडू आहेत ज्यांनी त्या काळातील सामन्यात फलंदाजीची सुरुवात केली आणि नंतर त्याच सामन्यात पहिले षटक टाकले होते.
विनू मंकड हे पहिले खेळाडू होते ज्याने नंबर १ पासून ते नंबर ११ पर्यंत फलंदाजी केली आहे. त्यांनी पहिल्यांदा त्याच सामन्यात शतक केले आणि नंतर त्याच सामन्यात शून्यावर देखील बाद झाले. विनू मंकड यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या सोबत त्यांनी १०० विकेट्स देखील घेतल्या आहे. असे करणारे ते पहिले खेळाडू ठरले होते.
हेही वाचा : CSK vs KKR: लाईव्ह शोमध्ये वीरेंद्र सेहवाग पुन्हा चर्चेत! CSK च्या जखमांवर तिखटाचा मारा.. पहा VIDEO
विनू मंकड यांनी २२ जून १९४६ रोजी इंग्लंड दौऱ्यावर वयाच्या २९ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दौऱ्यातून त्यांनी आपल्या प्रतिभेची दखल घ्यायला भाग पाडले होते. चार महिने चाललेल्या या दौऱ्यामध्ये भारताने २९ सामने खेळले होते. ज्यामध्ये विनू मंकडने १२९ विकेट्स मिळवल्या होत्या. तसेच त्यांनी १००० पेक्षा जास्त धावा देखील केल्या होत्या.
विनू मंकड यांनी भारतासाठी एकूण ४४ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी १६२ विकेट्स देखील घेतल्या आहेत. विनू मंकड एकाच मालिकेत दोन द्विशतके करणारे पहिले फलंदाज बनले होते. त्याच्या नावावर कसोटीत पाच शतके आणि सहा अर्धशतके जमा आहेत. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी एका डावात ८ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. विनू मंकड यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७८२ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर १९४७-४८ मध्ये अमरनाथ म्हणाले होते की, जर विनू नसता तर ऑस्ट्रेलियन संघाने १००० धावा केल्या असत्या. या दौऱ्यादरम्यान मंकड हे वादात अडकले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, दुसऱ्या कसोटीत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राउनला धावबाद केले. हा काही तेव्हा सामान्य धावबाद ठरला नव्हता. जेव्हा विनू हे गोलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू टाकण्यापूर्वीच ब्राउन धावण्यासाठी जात होता. सुरुवातीला विनू यांनी त्याला इशारा दिला होता, पण जेव्हा त्याने ऐकले नाही त्यावेळी त्याने चेंडू टाकण्यापूर्वी ब्राउनला धावबाद केले. यानंतर, अशा प्रकाराच्या रनआउटला मांकडिंग असे नाव देण्यात आले आहे.