उपांत्य फेरीपूर्वीच 'या' संघांनी केला पाकिस्तानला टाटा-बाय बाय..(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दुबई : दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा सामना खेळवला जात आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड समोरासमोर उभे ठाकले आहेत. या दोन संघांव्यतिरिक्त आणखी दोन संघ दुबईला पोहोचले आहेत. भारत आणि न्यूझीलंडशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही दुबईला आगमन झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु, भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने भारताचे सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. ‘अ’ गटातील न्यूझीलंड आणि भारत दोन्ही संघाने साखळी सामन्यात चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे.
तसेच ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ते आता दुबईत सराव करत आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेत फार कमी वेळा अशी परिस्थिति निर्माण होताना दिसून येते की, अंतिम चारमध्ये पोहोचणाऱ्या संघांना त्यांच्या पुढील सामन्यांबाबत माहिती नसते. या कारणामुळे सर्व संघ एकाच ठिकाणी पोहोचले आहेत. यामुळे क्रिकेट जगतात आजी-माजी खेळाडूंमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला योग्य काळजी घ्यावी लागणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे कोणताही निकाल लागू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ शुक्रवारी रात्री उशिरा कराचीहून दुबईला रवाना झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवल्यानंतर त्यांची गुणसंख्या पाचवर गेली आहे. दक्षिण आफ्रिका ब गटात अव्वल स्थानी पोहचून दुबईला रवाना झाली. त्यांच्यापैकी कोणाला दुबईतच मुक्कामी राहावं लागणार आहे? हे सध्या दुबईत सुरू असलेल्या भारतविरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी सामन्यातील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात जर भारताने बाजी मारली तर भारत अ गटात अव्वलस्थानी पोहचेल आणि मंगळवारी येथे पहिल्या उपांत्य फेरीत ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबर सामना रंगेल. मात्र, जर भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला तर तर त्यांचा सामना ब गटातील अव्वल स्थानी दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्याच बरोबर बुधवारी लाहोरमध्ये दुसरा उपांत्य सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानमध्ये परतावं लागणार आहे.
हेही वाचा : IND vs NZ : 300 व्या वनडेमध्ये ‘किंग कोहली’ फेल; ग्लेन फिलिप्सचा हवेत सुर मारत अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
याबाबत एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान निर्माण झालेली ही परिस्थिती अजिबात चांगली नाही. पण तरीही कार्यक्रम असाच चालतो. रावळपिंडीतील पावसामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. कारण, प्रत्यक्षात त्या दोन्हीही संघांना त्याचा फटका बसला आहे. यातील एक विशेष म्हणजे की दुबईत सामना खेळणाऱ्या संघाला परिस्थितीची समजून घेण्यासाठी अतिरिक्त दिवस मिळणार आहे.