देवदत्त पडिक्कलने घडवला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
Devdutt Padikkal has made history : बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये देवदत्त पडिक्कलने इतिहास घडवला आहे. त्याने क्वार्टर फायनलमध्ये नाबाद अर्धशतक झळकावून मोठा कारनामा केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या अनेक हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा देवदत्त पडिक्कल पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, देवदत्त पडिक्कलने २०२०-२१ मध्ये ७०० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी केली होती.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फक्त पाच फलंदाजांनी ७०० धावांचा टप्पा ओलंडण्यात यश मिळवले आहे. यामध्ये मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, नारायण जगदीसन आणि करुण नायर या खेळाडूंचा समावेश आहे. तथापि, एकाहून अधिक हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करण्याची किमया साधणारा फक्त देवदत्त पडिक्कल हाच एक खेळाडू आहे. त्याने दोनदा ७०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा : WPL 2026 मध्ये प्रेक्षकांना नो एंट्री! BCCI च्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त; ‘हे’ कारण आले समोर…
सोमवारी बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड १ वर मुंबई आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टरफायनल सामन्यात पडिक्कलला ७०० धावांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी ६० धावांची गरज होती. त्याने कर्नाटकच्या डावाच्या २४ व्या षटकात शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर ही कामगिरी केली आहे.
कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने या हंगामातील विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवत अरवंचे लक्ष्य वेधले. अद्याप भारतासाठी एकदिवसीय पदार्पण केलेले नाही, तरी पडिक्कलने या हंगामात आतापर्यंत चार शतके आणि दोन अर्धशतके लागावळी आहेत. त्याने झारखंडविरुद्ध ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून हंगामाची सुरुवात केली होती, त्याने ११८ चेंडूत १४७ धावा करून आपल्या संघाला बळकट केले होते. त्यानंतर त्याने केरळविरुद्ध १२४ धावांची खेळी करत कर्नाटकला ८ विकेटने विजय मिळवून दिला होता.
२९ डिसेंबर २०२५ रोजी अहमदाबादमध्ये तामिळनाडूविरुद्ध मात्र त्याला आपली छाप पाडता आली नाही. तो केवळ २२ धावा करू शकला. तथापि, त्याने पुढील दोन सामन्यांमध्ये मात्र, आपली क्षमता दाखवून दिली. त्याने आणखी दोन शतके झळकावली, पुडुचेरी आणि त्रिपुराविरुद्ध अनुक्रमे ११३ आणि १०८ धावा फटकावल्या. ६ जानेवारी रोजी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पडिक्कल शतक हुकला आणि तो ९१ धावांवर माघारी गेला. मध्य प्रदेशविरुद्ध कर्नाटकच्या शेवटच्या एलिट ग्रुप अ सामन्यात त्याने ३९ चेंडूत ३५ धावा फटकावल्या होत्या.
देवदत्त पडिक्कलने क्वार्टर फायनल सामन्यात मुंबईविरुद्ध नाबाद ८१ धावांची खेळी केली. पडिक्कलच्या खेळीमुळे कर्नाटकचा विजय निश्चित झाला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा ५५ धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.






