वसीम जाफरने वॉनला डिवचले (Photo Crdit- X)
Wasim Jaffer on Michael Vaughan: वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्सने मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या एकतर्फी सामन्यात इंग्लिश फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ केवळ 131 धावांवर ऑलआऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य केवळ 20.4 षटकांत सहज गाठले. आपल्याच मायदेशात इंग्लंडच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनची (Michael Vaughan) चांगलीच खिल्ली उडवली आहे.
पहिल्या वनडे सामन्यातील इंग्लंडच्या पराभवानंतर वसीम जाफरने मायकेल वॉनची चांगलीच मजा घेतली. जाफरने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर आयसीसी वनडे रँकिंगचा एक फोटो शेअर केला. त्यात त्याने खोचकपणे लिहिले, “इंग्लंड आठव्या क्रमांकावर… हे तर स्पष्टपणे खेळ भावनेच्या विरोधात आहे. आयसीसीने याकडे लक्ष द्यायला हवे.” जाफरने आपल्या या पोस्टमध्ये मायकेल वॉनलाही टॅग केले आहे.
England at No. 8… surely against the spirit of cricket. ICC should look into this. @MichaelVaughan pic.twitter.com/txSFOtJnh0
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 3, 2025
वसीम जाफर आणि मायकेल वॉन हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत. इंग्लंडच्या खराब कामगिरीवर जाफर वॉनला नेहमीच डिवचत असतो, तर भारतीय संघाची खराब कामगिरी झाली की वॉन जाफरला ट्रोल करतो.
हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. एका क्षणी 82 धावांवर 3 विकेट्स अशा चांगल्या स्थितीत असलेला इंग्लंडचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि अवघ्या 131 धावांवर गारद झाला. इंग्लंडच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत केशव महाराजने चार, तर वियान मुल्डरने तीन विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्ये एडन मार्करामने 55 चेंडूंमध्ये 86 धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 132 धावांचे लक्ष्य केवळ 3 विकेट्स गमावून सहज गाठले. आता दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ आता लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर 4 सप्टेंबर रोजी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल.