हार्दिक पांड्याचं पुनरागमन : हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरत असून पुढच्या सामन्यात तो टीम इंडियात सामील होणार हे निश्चित आहे. भारतीय संघ गुरुवार, ०२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळणार आहे, ज्यामध्ये स्टार अष्टपैलू खेळाडू भारतीय संघात सामील होणार असल्याची खात्री आहे. १९ ऑक्टोबरला बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्याच्या घोट्याला दुखापत झाली. एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, “हार्दिक पांड्या सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत असून तो मुंबईत संघात सामील होणार आहे. तो श्रीलंकेविरुद्ध खेळेल की नाही याबद्दल सध्या आम्ही ठोस काही सांगू शकत नाही, परंतु तो संघात सामील होण्यास तयार आहे.
हार्दिकच्या अनुपस्थितीत संघात हे बदल करण्यात आले. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर संघात दोन बदल करण्यात आले, जे यशस्वीही ठरले. सर्वप्रथम बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या ओव्हरचे तीन चेंडू टाकले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला.
हार्दिक पांड्याच्या जागी संघात सामील झालेला सूर्यकुमार यादव न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात २ धावा करून धावबाद झाला. पण पुढच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने संघासाठी ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लखनौच्या कठीण खेळपट्टीवर सूर्याने ४९ धावा केल्या, जिथे संघाचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले होते. तर दोन्ही सामन्यात मोहम्मद शमी पेटला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५ विकेट्स घेऊन आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट्स घेऊन तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.