ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ वि भारत १९ वर्षांखालील संघ(फोटो-सोशल मीडिया)
India U-19 vs Australia U-19 : भारत १९ वर्षांखालील संघ आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह, भारतीय १९ वर्षांखालील संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामने आणि दोन युवा कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने झाली आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने रचला इतिहास! मोडला शाकिब अल हसनचा विक्रम; T20 मध्ये केला ‘हा’ पराक्रम
ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाने आपले दोन्ही सलामीवीर फक्त १ धावा स्कोअर बोर्डवर असताना गमावले. अॅलेक्स टर्नर (०) आणि सायमन बज (०) ० धावांवर माघारी गेले. त्यानंतर स्टीव्हन होगन आणि विल मलाजचुक यांनी ३३ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.
मात्र, विल मलाजचुक जास्त काळ मैदानावर तग धरू शकला नाही. तो १७ धावांवर असताना माघारी गेला. त्यानंतर यश देशमुख ३५ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने फक्त ३५ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर टॉम होगन आणि स्टीव्हन होगन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलिया डाव सावरला.
स्टीवन देखील ३९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर टॉमने ४१ धावांची खेळी करून माघारी परतला. त्यानंतर आर्यन शर्मा १९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर जॉन जेम्सने नाबाद ७७ धावांची खेळी साकारत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० च्या पार नेण्यात यश मिळवले. बेन गॉर्डननेही १६ धावा केल्या. जॉन जेम्सच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघ २२५ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून गोलंदाजीमध्ये हेनिल पटेलने तीन, किशन कुमारने दोन आणि कनिष्क चौहानने दोन बळी टिपले.
हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या
धावांचा पाठलाग करताना, वैभव सूर्यवंशीने भारतीय अंडर-१९ संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने २२ चेंडूत ३८ धावा काढल्या आणि तो भारताच्या स्कोअर बोर्डवर ५० धावा असताना बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे ६ धावांकरून बाद झाला. विहान मल्होत्राही ९ धावांवर झटपट माघारी परतला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी १५० हून अधिक धावांची भागीदारी रचत भारतीय संघाच्या आशा पल्लवित केल्या.
वेदांतने ६९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले. तर अभिज्ञानने ७४ चेंडूंचा सामना करत नाबाद ८७ धावा चोपल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ५ षटकारांची आतिषबाजी केली आणि संघाला सामना जिंकून दिला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून चार्ल्स लॅचमुंडने सर्वाधिक २ विकेट घेतल्या आणि हेडन सिलचरने १ विकेट घेतली.