विराट कोहली आणि शुभमन गिल (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असून सामन्यात व्यत्यय येत आहे. सामन्यापूर्वी इंग्लडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करता आहे. या सामन्या दरम्यान भारताचा कर्णधार शुभमन गिलने एका नकोशा विक्रमाची नोंद केली आहे. तसेच त्याने विराट कोहलीच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी देखील केली आहे. शुभमन गिल या कसोटी मालिकेत पाच सामन्यांमध्ये पाच टॉस गमावणारा कर्णधार बनला आहे. ही नकोशी कामगिरी याआधी विराट कोहलीच्या नावावर जमा होती.
गेल्या २५ वर्षांत, असे केवळ दोनदा घडले आहे की, एखाद्या संघाकडून मालिकेत सर्व टॉस गमावण्यात आले. दोन्ही वेळा ही घटना भारतासोबत घडली आहे. एका संघाने मालिकेत सर्व पाच टॉस गमावण्याची ही १४ वी वेळ ठरली आहे. गेल्या २५ वर्षांत, हे फक्त २०१८ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात घडले होते, जेव्हा कोहली संघाचा कर्णधार होता.
हेही वाचा : PHOTOS : केएल राहुलसह ‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी गाजवले आहे ओव्हलचे मैदान; काढल्या खोऱ्याने धावा
२०१८ मध्ये भारत आणि इंग्लंडने बर्मिंगहॅम, लॉर्ड्स, नॉटिंगहॅम, साउथहॅम्प्टन आणि ओव्हल येथे पाच कसोटी सामने खेळवण्यात आले होते. या काळात जो रूटने सर्व टॉस जिंकले होते. या वेळी विराट कोहलीला एक देखील टॉस जिंकण्यात यश आले नव्हते. दुसरीकडे, २०१८ च्या दौऱ्यात इंग्लंडने भारतीय संघाचा ४-१ असा पराभव केला होता. दुसरीकडे, भारतीय संघ या मालिकेत मागे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आता सलग १५ वेळा टॉस गमावला आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये, आतापर्यंत १४ वेळा असे घडले आहे की, जेव्हा एखाद्या संघाने पाचही टॉस गमावलेले आहेत. यामध्ये केवळ एकदाच संघाला मालिका जिंकता आली आहे. इंग्लंडच्या संघाने १९५३ मध्ये हा कारनामा केला होता. त्यावेळी लिओनार्ड हटन इंग्लंडचचा कर्णधार होता.
मागील १३ वेळा मालिका तीन वेळा अनिर्णित राहिल्या आहेत. तर टॉस गमावणाऱ्या संघाने उर्वरित ९ वेळा पराभवाचा सामना केला आहे. जर भारताने लंडनमधील हा सामना जिंकला तर पाच टॉस गमावून देखील मालिका गमावण्यापासून वाचणारा तो चौथा संघ बनणार आहे. ओव्हल मैदानावर एक विशेष ट्रेंड सुरू असल्याचे दिसून येत आहे. येथील गेल्या सात कसोटी सामन्यांमध्ये, टॉस जिंकणारा संघ हा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आला आहे.