वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi sets a record in Under-19 cricket : २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. यांच्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर षटकात ९ गडी गमावून ४११ धावा केल्या आहेत. या दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने विक्रमी खेळी साकारली आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या ८० चेंडूत १७५ धावांची धुव्वाधार खेळी केली आहे. या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १७५ धावा केल्या. या खेळीदरम्यान वैभवने १५ षटकार आणि १५ चौकार लगावले. यासह, वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम रचले आहेत. त्याने रचेलले विक्रम जाणून घेऊया.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात १७५ धावा फटकावल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ठरला आहे. या यादीत उन्मुक्त चंद दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्याने २०१२ मध्ये भारताकडून खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १११ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट विल्यम्स (१०८), इंग्लंडचा स्टीफन पीटर्स (१०७) आणि भारताचा मनजोत कालरा (१०१*) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर येतात.
वैभव सूर्यवंशी १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. या आवृत्तीत त्याने एकूण ३० षटकार लगावले आहेत. यासह वैभवने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला पिछाडीवर टाकले आहे. ज्याने २०२२ मध्ये १८ षटकार मारले होते.
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात एकूण १५ षटकारांची आतिषबाजी केली. तो १९ वर्षांखालील विश्वचषकात एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल हिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये नामिबियाविरुद्ध १२ षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रेग सिमन्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २००२ मध्ये केनियाविरुद्ध ११ षटकार ठोकले होते.
Bigger the stage 🤝 Bigger the impact 🫡 Vaibhav Sooryavanshi with a record-breaking outing 👏 Updates ▶️ https://t.co/hisult6ODX #U19WorldCup pic.twitter.com/ZqS2BaddWo — BCCI (@BCCI) February 6, 2026
युवा एकदिवसीय डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सूर्यवंशीच्या नावावर जमा आह. डिसेंबरमध्ये आयसीसीए दुबई येथे यूएई १९ वर्षांखालील विरुद्ध त्याने १४ षटकार मारण्याचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला होता.
१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम सूर्यवंशीच्या नावे जमा आहे. त्याने ७१ चेंडूत ही कामगिरी करण्याची किमया साधली आहे. त्याच स्पर्धेत इंग्लंडच्या बेन मेयसने त्याच मैदानावर स्कॉटलंडविरुद्ध ९८ चेंडूत १५० धावा फटकावल्या होत्या. वैभवने आता १९ वर्षांखालील विश्वचषकात दुसरे सर्वात जलद शतक गाठले आहे, त्याने ५५ चेंडूत ही कामगिरी बजावली आहे.






