पुणे जिल्हा परिषद निवडणूक 2026 (फोटो- सोशल मीडिया)
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सात जागा
मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे निवडणूक प्रतिष्ठेची
पुणे: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील राजकीय चित्र यंदा वेगळ्याच वळणावर उभे राहिले आहे. तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने ही लढत केवळ पक्षीय न राहता प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदार पुन्हा प्रस्थापित नेतृत्वावर विश्वास ठेवणार की नवा इतिहास घडवणार?, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे भाजपकडून शिरूर ग्रामीण–न्हावरा गटातून मैदानात आहेत. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे भाजपच्या वतीने टाकळी हाजी गटातून लढत देत आहेत. तर, माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार मांडवगण फराटा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.
शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण सात जागा आहेत. मागील निवडणुकीत सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले होते, तर एका जागेवर लोकशाही क्रांती आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र यंदा भाजपने तालुक्यात कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?
टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामू अण्णा घोडे, शिवसेना (उबाठा)चे बाळासाहेब डांगे, शिवसेना (शिंदे)चे सुभाष पोकळे आणि भाजपचे राजेंद्र गावडे अशी चौरंगी लढत होत आहे. या गटात माजी आमदार पोपटराव गावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिरूर ग्रामीण–न्हावरा गटात मालतीताई पाचर्णे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली वाळके यांचे आव्हान आहे. दिवंगत बाबूराव पाचर्णे यांच्याविषयीची सहानुभूती मतदारांवर कितपत परिणाम करणार, याची चर्चा रंगली आहे.
चौरंगी लढतींनी चर्चांना उधाण
मांडवगण फराटा गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, शिवसेना (ठाकरे)चे मच्छिद्र गदादे, भाजपचे सचिन शेलार आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे दादासाहेब फराटे यांच्यात चौरंगी सामना होत आहे. तळेगाव–रांजणगाव सांडस गटात रेखा बांदल (राष्ट्रवादी), सारिका करपे (शिवसेना शिंदे), दीपाली गव्हाणे (भाजप) आणि रेश्मा शिंदे (अपक्ष) यांच्यातील लढतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. शिक्रापूर–सणसवाडी गटात मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी) आणि सीमा कळमकर (अपक्ष) यांच्यात थेट लढत होत आहे. येथे भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पाबळ–केंदूर गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल शिवले आणि भाजपचे विकास गायकवाड यांच्यात थेट सामना आहे.
Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…
दोन्ही पक्षांचा प्रचारात वेग
रांजणगाव गणपती गटात मागील टर्ममधील जिल्हा परिषद सदस्य स्वाती पांचुदकर (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे. औद्योगिक वसाहतीचा प्रभाव असलेल्या या गटात दोन्ही पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.






