सौजन्य - BCCI IND vs ENG T-20 Match : हार्दिक, तिलक, वरुण चक्रवर्ती, अर्शदीपसह रिंकूचा जोरदार सराव; देहबोलीवरून मालिका विजयाचा विश्वास
पुणे : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लडचा टी-20 सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई यांनी जोरदार सराव केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक, संजू सॅमसन, तिलक वर्मा यांनी फलंदाजीचा जोरदार सराव केला. तर अर्शदीप, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई यांनी गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा चांगला सराव केला. सीमेवर झेल पकडण्याचा चांगला सराव देखील खेळाडूंनी केला.
भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सातत्याने अपयशी
इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर रंगणाऱ्या चौथ्या ‘टी-२०’ क्रिकेट सामन्याआधी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सातत्याने अपयशी ठरत असलेला सलामीवीर संजू सॅमसन आणि रिंकू सिंहची दुखापत आणि फाॅर्म या दोन चिंता वाढवणाऱ्या बाबी असतील. राजकोटमधील तिसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघासमोर मुंबईत दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अखेरच्या सामन्याआधी मालिका जिंकण्याची आणखी एक संधी आहे.
पुण्याच्या गहुंजेवर जोरदार सराव
📍 Pune
Inching closer to the 4th #INDvENG T20I 👌👌@IDFCFIRSTBank pic.twitter.com/nFZZmtGaUG
— BCCI (@BCCI) January 31, 2025
केरळचा यष्टिरक्षक फलंदाज सॅमसनने ‘टी-२०’ सत्राची सुरुवात बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन शतके झळकावून केली. मात्र, सध्याच्या मालिकेत त्याने केलेल्या २६, ५ आणि ३ अशा धावा चिंता वाढवणाऱ्या आहेत. तो १४५ किमी वेगाच्या चेंडूंचा सामना करण्यात अपयशी ठरत आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने तस्कीन अहमद, तंजीम हसन शाकीब यांचा सामना केला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या अँडिले साइमलेन आणि लुथो सिम्पाला यांचा त्याने सामना केला; पण इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या १४५ ते १५५ किमी वेगाच्या चेंडूसमोर खेळणे सॅमसनसाठी अडचणीचे ठरत आहे.
तीन सामन्यांमध्ये तो फिल साॅल्टकडे झेल देऊन परतला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुढील वर्षी होणाऱ्या ‘टी-२०’ विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सॅमसनवर पुन्हा विश्वास दाखवतील; पण त्याच्या फलंदाजीतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
रिंकूची दुखापत ठरणार चिंतेचा विषय
रिंकू सिंह तंदुरुस्त नसल्यामुळे सातव्या क्रमांकावर ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली होती; पण तो या प्रारूपात अपयशी ठरत आहे. रिंकूला पहिल्या दोन सामन्यांत विश्रांती देण्यात आली आहे. पुण्यातील सामन्यासाठी तो तंदुरुस्त झाल्याचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोश्चेटे यांनी सांगितले; पण रिंकूचा फाॅर्माही चिंतेचा विषय असेल.
भारतीय संघाची मधली फळी इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशीदचा सामना करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे अशावेळी शिवम दुबेला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा पर्याय रमनदीप सिंह याचा आहे. तो वेगवान गोलंदाज आणि उत्तम फिनिशर आहे. मोहम्मद शमीने चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंहला संधी मिळाल्यास तो पॉवर प्लेमध्ये भारताला बळी मिळवून देऊ शकतो.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रमनदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वाॅशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशिद, साकिब महमूद, फिलिप साॅल्ट, मार्क वूड.