वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडिया)
Ind vs Eng under 19 : आयपीएल २०२५ चा हंगाम गाजवणारा वैभव सूर्यवंशी आता इंग्लंडच्या भूमीवर आपल्या बॅटने कहर करत आहे. त्याची कीर्ती शिखरावर आहे. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध अवघ्या ५२ चेंडूत शतक पूर्ण करून इतिहास लिहिला आहे. यादरम्यान वैभवने १९२.३१ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. त्याने या खेळीत १० चौकार आणि ७ षटकार लगावले आहेत. यासह, त्याने मोठी कामगिरी केलीय आहे. तो अंडर-१९ युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.
वैभव सूर्यवंशीने शनिवारी (५ जुलै) युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावले आहे. या कामगिरीने त्याने इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव लिहिले आहे. १४ वर्षीय सूर्यवंशीने भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध ५२ चेंडूंचा सामना करून पहिले शतक साकारले आहे. त्याने अवघ्या १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
१४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजीचा नमूना पेश करून सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले आहे. १९ व्या षटकात फिरकी गोलंदाज राल्फी अल्बर्टच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन त्याने आपल्या शतकाला गवसणी घातली आहे. चौथा सामना भारत अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ यांच्यात वॉर्सेस्टर येथे खेळवला जात आहे. या मालिकेत, वैभवने पहिल्या सामन्यात ४८, दुसऱ्या सामन्यात ४५ आणि तिसऱ्या सामन्यात ८६ धावा फटकावल्या होत्या. पहिल्या दोन सामन्यात वैभव अर्धशतक पूर्ण करू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो आपल्या शतकापासूनही हुकला. पण चौथ्या सामन्यात मात्र, वैभवने कोणतीही चूक न करता आपले शतक पूर्ण केले आणि इतिहास रचला.
त्याने फक्त २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील ५० धावा त्याने २८ चेंडूंमध्ये काढल्या. सूर्यवंशीपूर्वी, युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या कासिम अक्रमच्या नावावर जमा होता. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी नॉर्थ साउंड येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तान-श्रीलंका सामन्यादरम्यान, त्याने ६३ चेंडूंचा सामना करत १०० धावांचा टप्पा पार केला होता.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीने २ जुलै रोजी नॉर्थम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात फक्त ३१ चेंडूत ८६ धावा केल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ३४ चेंडूत ४५ धावा आणि पहिल्या सामन्यात १९ चेंडूत ४८ धावा फटकावल्या होत्या.






