IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात असून या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने या सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर सर्वबाद केले आणि १८० धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर, तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने १ विकेट गमावून ६४ धावा केल्या होत्या. या दरम्यान भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.
शुक्रवारी (४ जुलै) रोजी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने भारतीय फलंदाज बनून एक नवा विक्रम रचल आहे.
यशस्वी जयस्वालला कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या डावात फक्त १० धावांची गरज होती आणि सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ब्रायडन कार्सेला चौकार मारून त्याने हे लक्ष्य सहज गाठले. तथापि, तो दुसऱ्या डावात २८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर जयस्वालला जोश टोंगेने आपला बळी बनवले.
हेही वाचा : Grand Chess Tour : भारताच्या डी गुकेशच ६४ घरांचा ‘राजा’, कार्लसनला पुन्हा दिला दणका; असा झाला खेळ..
भारत आणि इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना हा यशस्वीचा भारताकडून खेळताना २१ वा कसोटी सामना आहे. त्याच्या आधी कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांनी नोंदवला होता. गावस्कर यांनी ७ ते १२ एप्रिल १९७६ दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २३ व्या कसोटी सामन्यात २००० धावांचा टप्पा पार केला होता. गौतम गंभीर २४ कसोटींसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी त्यांच्या २५ व्या कसोटी सामन्यात २००० धावांचा गड सर केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम महान डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर कायम आहे. ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांच्या १५ व्या कसोटी सामन्यातच २००० धावांचा टप्पा पार केला होता.
हेही वाचा : SL VS BAN : माजी कर्णधारासह 6 खेळाडू बाहेर, T20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा
जयस्वालने डावांच्या बाबतीत सांगायच झाल्यास राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्यांच्या खेळण्याच्या काळात, द्रविड आणि सेहवागने ४० व्या कसोटी डावात २००० धावांचा टप्पा ओलांडला होता.