IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना काल शनिवारी खेळला गेला. या सामन्यात भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघाने टी२०आय मालिकेत न्यूझीलंडवर ४-१ अशी सरशी साधली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पाच विकेट काढल्या. त्याने ही कामगिरी केली असली तरी देखील त्याच्या नावे एक लाजिरवाणा पराक्रम नोंदवला गेला.
तिरुअनंतपुरममध्ये भारताच्या विजयात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकांत ५१ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. या कामगिरीसह, अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी२०आय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा आणि ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा नकोसा विक्रम वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफच्या नावे जमा होता. जोसेफने २०२३ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० धावांत ५ बळी घेतले होते. तसेच, २०२२ मध्ये ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी न्गीडीने ३९ धावांत ५ बळी घेतले होते.
अर्शदीप सिंगने भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. २०२२ मध्ये पदार्पण करणाऱ्या या डावखुरा वेगवान गोलंदाजाने ७६ सामन्यांमध्ये ११८ बळी टिपले आहेत. अर्शदीप सिंगने एका डावात ५ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. तथापि, या सामन्याच्या पहिल्या दोन षटकांमध्ये अर्शदीपने पहिल्या दोन षटकांमध्ये जवळजवळ ४० धावा मोजल्या होत्या.
A successful bowling outing and a five-wicket haul to savour 🙌 Congratulations Arshdeep Singh 👏👏 Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/J0lIIO6XXl — BCCI (@BCCI) January 31, 2026
मॅचबाबत, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून इशान किशनच्या पहिल्या टी-२० शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या झंजवाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद २७१ धावांचा डोंगर उभा केला होता. किशनने ४३ चेंडूत १० षटकार आणि ६ चौकारांसह १०३ धावा कुटल्या. याशिवाय, कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा फटकावल्या, ज्यामध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याने ४ षटकार आणि १ चौकार लगावले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाने फिन अॅलनच्या ३८ चेंडूत ६ षटकार आणि ८ चौकारांसह ८० धावांच्या जोरावर १९.४ षटकात २२५ धावाच करता आल्या. परिणामी सामना ४६ धावांनी गमावावा लागला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर अक्षर पटेलने ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.






