IND vs PAK (Photo Credit- X)
IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या एकतर्फी सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलमान अली आगाच्या संघाला जोरदार धूळ चारली. या विजयामुळे भारताने 4 गुण मिळवून सुपर 4 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे, तर पाकिस्तानचा संघ 2 गुणांवर अडकून पडला आहे. यामुळे, आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे: याच आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा सामना होणार का?
भारताकडे 4, पाकिस्तानकडे 2 गुण
भारत आणि पाकिस्तानला आशिया कपच्या ‘ग्रुप ए’ मध्ये ठेवण्यात आले आहे. भारताने आपले दोन्ही सामने जिंकून सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, पाकिस्तानचे सुपर 4 मधील स्थान अद्याप निश्चित नाही. त्यांना पुढील फेरी गाठण्यासाठी काही समीकरणे जुळवावी लागतील. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला, तर पाकिस्तानने ओमानला हरवले होते.
यूएई आणि ओमानचा सामना ठरणार महत्त्वाचा
आगामी काळात यूएई आणि ओमान यांच्यात एक महत्त्वाचा सामना होणार आहे. जर या सामन्यात यूएईने ओमानला हरवले, तर त्यांचेही 2 गुण होतील. त्यानंतर पाकिस्तानचा सामना यूएईसोबत होईल. जर या सामन्यातही यूएईने विजय मिळवला, तर त्यांचे ४ गुण होतील आणि पाकिस्तान 2 गुणांवरच राहील. अशा परिस्थितीत भारत आणि यूएई हे दोन्ही संघ सुपर ४ मध्ये जातील, तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल.
IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम
21 सप्टेंबरला पुन्हा ‘महामुकाबला’?
आशिया कपच्या लीग फेरीनंतर, सुपर 4 चे सामने सुरू होतील. 21 सप्टेंबर रोजी ‘ग्रुप ए’ मधील पहिल्या दोन संघांमध्ये लढत होईल. म्हणजेच, भारतीय संघ या दिवशी पुन्हा एकदा मैदानात उतरेल. भारताचा पुढील सामना ओमानसोबत होणार आहे आणि त्यात विजय मिळवून भारत 6 गुणांसह ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, 21 सप्टेंबर रोजी भारताचा सामना यूएई किंवा पाकिस्तान यापैकी कोणाशी होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर, भारतीय संघाने त्यांच्यासोबत हात मिळवण्यासही नकार दिला होता. यामुळे दोन्ही संघांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे जर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा भारत-पाकिस्तानचा सामना झाला, तर तो आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.