अहमदाबादमधील पाचव्या T20I सामना(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 5th T20I Weather Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील चौथा सामना १७ डिसेंबर रोजी लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु, दाटलेल्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता, सर्वांच्या नजरा पाचव्या आणि शेवटच्या T20I सामन्यावर असून हा सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यामुळे मालिकेचा निकाल काय लागतो हे निश्चित होईल.
लखनऊ सामना रद्द झाल्यानंतर चाहते हवामानाबद्दल अधिक चिंता व्यक्त करत आहेत. परंतु अहमदाबादमधून मात्र आता चांगली बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते, १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमधील हवामान पूर्णपणे निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. तसेच आकाश निरभ्र राहणार असून पाऊस किंवा धुक्याचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. दिवसाला तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर रात्री किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, चाहते पूर्ण २० षटकांच्या सामन्याचा थरार पाहू शकतात.
हवामानासह, अहमदाबादची हवेची गुणवत्ता देखील समाधानकार्क आहे. सध्या, AQI १०० ते १२० दरम्यान नोंदवले गेले असून जे खेळासाठी स्वीकार्य मानले जाते. त्यामुळे, खेळाडूंना श्वसनाच्या कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सध्या महत्त्वाच्या वळणार आलेली आहे. चार सामन्यांनंतर, टीम इंडिया २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे, भारतीय संघ अहमदाबादमधील अंतिम सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा : Yashasvi Health Update : यशस्वी जयस्वालच्या तब्बेतीबाबत धक्कादायक खुलासा! 2 दिवसांत घडले असे काही…
भारतीय संघासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम शानदार राहिले आहे. या मैदानावर भारतीय संघ मजबूत दिसून आला आहे. अनेक टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रम देखील भारताने नावे केले आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत येथे एकूण ७ टी-२० सामने खेळले असून ज्यामध्ये भारताने ५ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत.






