जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Jasprit Bumrah created history, IND VS WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि त्याने इतिहास रचला आहे. जगातील नंबर १ कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा हा ५० वा कसोटी सामना आहे. आता जसप्रीत बुमराह हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी किमान ५० सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत कसोटीत २२२ बळी टिपल्या आहेत. तसेच त्याने ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९ बळी घेण्याची किमया साधली आहे. त्याने ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये, बुमराहने १५ पाच विकेट्स काढल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त दोन वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याला अद्याप टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकदा देखील पाच विकेट्स घेता आलेल्या नाहीत.
हेही वाचा : Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा
भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी ५० सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनी त्यानंतर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा एकूण ५० सामने खेळण्याची किमया साधली आहे.
मागील आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी एकूण २० षटके गोलंदाजी केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या डावात त्याने तीन बळी घेतले होते, परंतु दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. अहमदाबाद कसोटी सामन्यात बुमराहच्या तिसऱ्या बळीमुळे त्याला भारतात ५० कसोटी बळी पूर्ण करण्यास मोठी मदत झाली. तीन वेगवेगळ्या देशांमध्ये किमान ५० विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या १४ कसोटी सामन्यांमध्ये ५० फलंदाजांना माघारी पाठवले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये ६४ फलंदाजांना बाद केले आहे.जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडमध्येही १२ कसोटी सामन्यांमध्ये ५१ फलंदाजांना आपली शिकार बनवले होते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर जमा आहे.