एलिस पेरीने इतिहास घडवला(फोटो-सोशल मीडिया)
Ellyse Perry creates history against India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून जिथे टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. टी-२० मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत आहे. दरम्यान, भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची अनुभवी एलिस पेरीने इतिहास रचला आहे.
एलिस पेरीचा हा ३५० वा सामना ठरला. ती ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी ३५० सामने खेळणारी पहिलीच खेळाडू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. पेरीपूर्वी फक्त दोन खेळाडूंनी ही कामगिरी बजावली आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी ही कामगिरी केली आहे.
२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एलिस पेरीने आजपर्यंत ३५० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. एका वृत्तानुसार, पेरी म्हणाली की, “माझ्या मनात कोणतेही विशिष्ट टप्पे नाहीत. मला फक्त हा संघ काय करत आहे ते अनुभवायचे आहे आणि जोपर्यंत मी योगदान देऊन त्यात समाधान मिळवत आहे तोपर्यंत मला येथेच राहायला आवडेल. पुढे नेहमीच रोमांचक गोष्टी असतात, पण ते कुठे जाते ते आपण पाहणार आहोत.”
एलिस पेरीनंतर, सध्याची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार एलिसा हीलीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक सामने खेळलेले आहेत. हीलीने एकूण २९५ सामने खेळलेले आहेत. हीलीने पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या डे-नाईट कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे.
एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी पेरीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, तिने १४ कसोटी सामन्यांमध्ये ९३० धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये तिने दोन शतके आणि चार अर्धशतक लगावले आहेत. नाबाद २१३ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. तिने ३९ बळी देखील टिपले आहेत. तिने १६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३७ डाव खेळले आहेत, ४,५०४ धावा केल्या आहेत आणि १६६ बळी घेतले असून ज्यात तीन शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या १७० टी-२० सामन्यांमध्ये २,२०० धावा आणि १२६ बळी आहेत, यामध्ये तिने ९ अर्धशतके ठोकली आहेत.






