मानव सुथारने घेतल्या पदार्पणातच ६ विकेट्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मानव सुथारने सहा बळी घेतले
भारतासाठी मानव सुथार स्टार ठरला. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करत पहिल्या डावात सहा बळी घेतले. त्याने संघासाठी एकूण २२ षटके गोलंदाजी केली. दरम्यान, त्याने १.५० च्या इकॉनॉमी रेटने अब्दुल मलिक (१६), रहमानुल्ला गुरबाज (१२), रहमत शाह (६०), अफसर झाझाई (०३), शराफुद्दीन अश्रफ (११) आणि मोहम्मद सलीम (००) यांच्या विकेट्स घेतल्या. केवळ ३३ धावा देत त्याने ६ बळी घेतले आहेत. जागतिक स्तरावरही मानव सुथारच्या खेळीचे कौतुक आहे.
प्रसिद्ध कृष्णाने तीन विकेट्स घेतल्या
मानव सुथार व्यतिरिक्त, प्रसिद्ध कृष्णा देखील पहिल्या डावात चांगल्या लयीत दिसला. त्याने संघासाठी एकूण ११ षटके गोलंदाजी केली. या काळात त्याने ३.३६ च्या इकॉनॉमी रेटने ३७ धावांत तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या बळींमध्ये सेदिकुल्ला अटल (१७), कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (२०) आणि अझमतुल्ला ओमरझाई (००) यांचा समावेश होता.
वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट मिळाली
भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या या एकमेव कसोटी सामन्यात मानव सुथार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदरने देखील एक विकेट घेतली. सुंदरने पंतच्या गोलंदाजीवर झियाउर रहमानचा (०६) झेल घेऊन त्याला बाद केले. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना यश मिळाले नाही. भारतीय संघाने कमालीचे प्रदर्शन दाखवले आणि अफगाणिस्तान संघाला केवळ १५२ धावांमध्ये नेस्तनाबूत केले. दरम्यान आता फॉलोऑन टळणार का हेदेखील पहावे लागणार आहे.






