IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित
अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या गोलंदाजीवर सलामीवीर अब्दुल मलिक अवघ्या १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एका अप्रतिम चेंडूवर सेदिकुल्ला अटलला १७ धावांवर बाद केले. त्यानंतर सुथारने रहमानुल्ला गुरबाजला १२ धावांवर बाद करून अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले.अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाने शाहिदीला धावांवर बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, मानव सुथारने आसिफ झाझाईला ३ धावा बाद करून भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. आता अफगाण संघाच्या सर्व आशा रहमत शाहवर अवलंबून आहेत.
मुल्लांपूर कसोटी सामन्यात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारची भारतीय संघात निवड झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी सावध सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी ४८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. अफगाण गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. मोहम्मद सलीम साफीने शुभमनला बाद करून भारताची चौथी विकेट मिळवली. गिल १७७ चेंडूंचा सामना करून १२६ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीत १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, पंतचे शतक हुकले आणि त्याने ८१ धावा केल्या. ध्रुव जुरेल १९ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि मानव सुथार यांनी सूत्रे हाती घेतली आणि सातव्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या. मानव सुथारने २८, यशस्वीने २४, मोहम्मद सिराजने २२ आणि ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. अखेरीस भारताने ५६४-८ धावांवर डाव घोषित केला.
A dream debut continues in whites 🤍 Wicket No. 3️⃣ for Manav Suthar 👏 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/29ugmUzVZl — BCCI (@BCCI) June 7, 2026
सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या बाजूने होता. सलामीवीर केएल राहुलने १६५ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण करत आपले १२ वे कसोटी शतक झळकावले आणि संघाला भक्कम सुरुवात करून दिली. या खेळीत ११ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनेही सर्वाधिक १२६ धावांची संयमी पण प्रभावी खेळी केली. गिलनेही ११ चौकार आणि एका षटकारासह १३८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे गिलचे ११ वे कसोटी शतक होते. युवा फलंदाज साई सुदर्शनने ८१ धावा करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. या तिघांच्या भागीदारीमुळे भारताने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.
भारतीय संघ: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
अफगाणिस्तान संघ: सेदीकुल्ला अटल, रहमानउल्ला गुरबाज, अब्दुल मलिक, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अफसर झाझाई (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेलिया खरोती, झियाउर रहमान शरीफी आणि मोहम्मद सलीम सफी.






