'धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री केलं तर मराठे अंगावर येतील'; मनोज जरांगेंचा इशारा, पंकजा मुंडेंवरही निशाणा
राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र विरोध नोंदवत सरकारला थेट इशारा दिला आहे. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास मराठा समाज तीव्र भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, “धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री कसं करतात ते आम्ही पाहू. त्यांना मंत्रिपद दिलं तर मराठे अंगावर येतील. अजित पवारांनी स्वतः त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. धनंजय मुंडेंमुळे मराठा आणि वंजारी समाजात दुरावा निर्माण झाला आहे. त्यांच्या पुनरागमनाला आम्ही विरोध करू.” जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत त्यांच्यामुळे समाजात तणाव निर्माण झाल्याचा आरोपही केला.
यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही मनोज जरांगे यांनी निशाणा साधला. जालन्यातील काही भाजप आमदारांनी पालकमंत्री निधीच्या वाटपाबाबत तक्रारी केल्याचा दावा करत त्यांनी, “पंकजा मुंडे यांनी पक्षात सगेसोयरे आणू नयेत. निधीचे वाटप सर्वांना समानपणे व्हायला हवे,” असे म्हटले. त्यांनी पंकजा मुंडे यांना अहंकारी असल्याचेही म्हटले, मात्र त्या खुनशी नसल्याचेही स्पष्ट केले.
दिल्लीतील आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. “आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे. सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी संवाद साधावा. सोनम वांगचूक यांना देशभरातून पाठिंबा मिळायला हवा,” असे ते म्हणाले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






