आकाश चोप्रा आणि जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मिडिया)
India vs England Test Series : आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी भारतीय संघ 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला रवाना झाला आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना २० जूनला खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मर्यादित वापर करण्यावर भाष्य केलेया आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या आगामी कसोटी दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा करताना, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पुष्टी केली होती की, बुमराहला त्याच्या व्यस्त वेळापत्रकानुसार सलग कसोटी न खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता.
जिओस्टारशी बोलताना, आकाश चोप्रा म्हणाला की, ” कठीण परिस्थितीत जसप्रीत बुमराहचा वापर करणे मोहक असणार आहे. विशेषतः कठीण बर्मिंगहॅम आणि ओव्हल दरम्यान येथे भारताला त्याच्या अनुभवी गोलंदाजांची गरज भासणार असणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला बुमराहची आवश्यकता असेल, कारण कठीण परिस्थितीत तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंची आवश्यकता भासत असते.”
या मालिकेत भारत रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूशिवाय खेळणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताकडे अनुभवाचा अभाव आहे आणि युवा शुभमन गिलवर कर्णधारपदाची धुरा असणार आहे.
चोप्रा पुढे म्हणाला की, अपेक्षा आव्हान कठीण करतात. परंतु, नवीन संघासह काही दिलासा मिळतो. लोकांचा असा विश्वास आहे की ही तरुणांची टीम आहे. जर तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी जिंकण्याची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही वास्तववादी नाही. दबाव अजूनही असणार आहे, परंतु तो अनुभवी संघाला येणाऱ्या दबावापेक्षा वेगळा आहे जिथे फक्त जिंकण्याची अपेक्षा उपस्थित असते.