Virat Kohli च्या अडचणीत वाढ(फोटो-सोशल मिडिया)
Bengaluru stampede : आरसीबीने ३ जून रोजी आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाबला पराभूत करून १७ वर्षांनंतर आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा आनंद साजरा करत असताना बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात अनेकांना आधीच अटक करण्यात आली आहे. अशातच आता स्टार खेळाडू विराट कोहलीच्या अडचणी वाढल्या आहेत. एका स्थानिक व्यक्तीने कोहलीविरुद्धही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली असून त्याने या मागणीसह बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये कोहलीविरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. कर्नाटक सरकारने यासाठी आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएला जबाबदार धरले असून क्यूबन पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, तसेच ४ जणांना अटक केली आहे. परंतु, एचएम वेंकटेश नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्धही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसह त्याने क्यूबन पार्क स्टेशनवर कोहली विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, ते आधीच नोंदवलेल्या तक्रारीत या तक्रारीचा समावेश करून या तक्रारीचा विचार करणार आहेत.
४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात कर्नाटक पोलिसांकडून आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्सच्या ३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वेळी निखिल सोसाळे बेंगळुरूहून मुंबई विमानतळावर जात होता अशी माहिती मिळत आहे. या चौघांनाही शुक्रवारीच बेंगळुरू येथील ४१ व्या एसीजेएमसमोर हजर करण्यात आले होते, तेव्हा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांची रवानगी प्रपन्ना अग्रहारा तुरुंगात करण्यात आली आहे.
बेंगळुरू चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी राहुराम भट आणि त्यांच्या काही सहकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केएससीएने उच्च न्यायालयाकडे एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे.एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, पोलिसांकडून गेल्या गुरुवारी आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध ही एफआयआर नोंदवण्यात आली आह. या प्रकरणी आता कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार संरक्षण देण्यात आले आहे. आता उच्च न्यायालय ९ जून रोजी निखिल सोसले यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.