(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
एका वृत्तानुसार, आगामी सामन्याच्या काही दिवस आधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या संघाच्या अनिवार्य सराव सत्रात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इतर दोन महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित होते. मिचेल सँटनरने नुकतेच टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतही तो सहभागी होता, जिथे तीन सामने खेळल्यानंतर त्याला दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. तो लवकरच मुंबई संघात सामील होईल, मात्र त्याच्या आगमनाबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.
विल जॅक्स वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध असणार आहे आणि तो संघात उशिरा सामील होऊ शकतो. जॅक्सने टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि इंग्लंडला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघात जॅक्सचा समावेश होता आणि त्यानंतर तो संघासोबत चार्टर विमानाने इंग्लंडला रवाना झाला. सँटनर आणि जॅक्स भारतात पोहोचले आहेत की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
रविवारच्या सामन्यापूर्वी MI आणि KKR या दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियमवर सराव केला. नेट्समध्ये MI च्या रोहित शर्माने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आणि तासभर फलंदाजी करत प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीचा सामना केला. शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांनी त्याच्यासमोर दमदार गोलंदाजी केली. हार्दिकने जवळपास एक तास गोलंदाजी केली आणि फलंदाजीचाही प्रयत्न केला. सरावाच्या अंतिम टप्प्यात, MI चे वेगवान गोलंदाज दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मोहम्मद इझार यांनी गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली. त्यामुळे हे दोन खेळाडून सुरुवातीच्या सामन्यात नसल्यामुळे MI संघाच्या मजबुतीत फारसा फरक पडणार नाही अशी शक्यता आहे. आता संघ कशी कामगिरी करतो हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.






