मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज(फोटो-सोशल मिडिया)
MI vs PBKS : आयपीएल २०२५ च्या काल पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले. या विजयानंतर संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत आपला आनंद साजरा केला आहे. या दरम्यान, वाडिया यावेळी श्रेयस अय्यरचे अभिनंदन करताना त्याचे चुंबन देखील घेताना दिसून आले.
क्वालिफायर-२ मध्ये पंजाब संघाने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आपल्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी खेळाडूंसोबत देखील केक कापला आणि तो कर्णधार श्रेयस अय्यरला खायला दिला. तेव्हा त्यांनी अय्यरचे चुंबन देखील घेतले. तसेच विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
Ness Wadia kissing Shreyas Iyer during the celebration. ❤️pic.twitter.com/5mG7n4m1c6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 2, 2025
पंजाब किंग्जने मुंबई विरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्ये संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, परंतु कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला पराभूत करून तत्यांचे स्वप्न मोडले. परंतु यावेळी संघ चांगल्या लयीत आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी जेतेपद जिंकणारा श्रेयस अय्यर पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी तयार झाला आहे.
क्वालिफायर २ सामन्यात अहमदाबादमध्ये पाऊसन सुरू झाल्यामुळे सामना लेट खेळवण्यात आला. या सामन्यात श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली खेळी करून मुंबईच्या हातचा विजय खेचून आणला. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याचे उत्तर मुंबई इंडियन्सच्या कुणाच्याच गोलंदाजांकडे सापडत नव्हते. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून २०३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १९ व्या षटकात टार्गेट पूर्ण केले. यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावांची नाबाद खेळी करून संघाला अंतिम सामन्यात पोहचवले.