श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाला नवीन विजेता मिळणार आहे. ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने असणार आहेत. यावेळी अंतिम सामना इतर सर्वांपेक्षा वेगळा असणार आहे. चालू हंगामात कोणताही संघ जिंकेल, आरसीबी किंवा पंजाब किंग्ज, प्रथमच आयपीएल ट्रॉफी जिंकणार आहे. त्यानुसार, चाहत्यांना एक नवीन चॅम्पियन बघायला मिळणार आहे. यावेळी बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
आयपीएल सुरू झाली तेव्हापासून हे दोन्ही संघ आयपीएल खेळत आहेत. परंतु आतापर्यंत त्यांना ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावेळी या दोघांपैकी एका संघाचे स्वप्न पूर्ण होणार आणि आयपीएलला नवीन विजेता देखील मिळेल. परंतु अंतिम सामन्यापूर्वी, अहमदाबादचे हवामान दोघांच्याही चिंतेत भर टाकणारे आहे. ३ जून रोजी अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
३ जून रोजी अहमदाबादमध्ये जेतेपदाच्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस अंतिम सामन्याचा खेळ खराब करण्याची शक्यता आहे. तथापि, बीसीसीआयकडून पावसाला तोंड देण्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यत आली आहे. जर पावसामुळे सामना उशिरा सुरू करण्यात आला तर यासाठी अतिरिक्त १२० मिनिटे वेळेची तरतूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयकडून आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची देखील तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की जर ३ जून रोजी अहमदाबादमध्ये पाऊस पडला तर त्याचा अंतिम सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राखीव दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवला आहे.
बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी ४ जून रोजी राखीव दिवसाची तरतूद केली आहे. परंतु जर या दिवशी पाऊस पडला आणि सामना सुरू झाला नाही तर त्याचा फायदा पंजाब किंग्जला मिळणार आहे. जर ४ जून रोजी पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला विजेता घोषित करण्यात येणार आहे. यामागील कारण म्हणजे पंजाब किंग्ज पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे.
पंजाब किंग्ज आणि आरसीबी दोघांचेही समान १९-१९ गुण झाले आहेत. पण पंजाब किंग्जचा रनरेट बंगळुरूपेक्षा अधिक चांगला आहे. त्यामुळेच सामना रद्द झाल्यास पंजाब किंग्ज जिंकणार आहे. सध्या पंजाब किंग्जचा रनरेट ०.३७२ आहे. त्याच वेळी, बंगळुरूचा रनरेट ०.३०१ आहे. पण हे तेव्हा होईल जेव्हा ३ आणि ४ जून रोजी अहमदाबादमध्ये पावसामुळे सामना पाच षटकांपर्यंत देखील खेळवला जाणार नाही.