Mohammed Rizwan (Photo Credit- X)
Caribbean Premier League 2025: आशिया कप २०२५ साठी (Asia Cup 2025) नुकताच पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा झाली, ज्यात मोठे खेळाडू बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना स्थान मिळालं नाही. गेली अनेक वर्षं हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचे मानले जात होते. या निर्णयामुळे नाराज झालेल्या रिझवानने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो लवकरच पहिल्यांदाच एका परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
आशिया कपच्या संघातून बाहेर पडल्यानंतर रिझवानने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CPL 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी त्याला सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने करारबद्ध केले आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या जागी तो संघात दाखल झाला आहे, कारण फारुकीला आशिया कपपूर्वी होणाऱ्या त्रिकोणीय टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघात सामील व्हावे लागणार आहे.
Mohammad Rizwan is heading to the CPL for the first time, joining the St Kitts and Nevis Patriots as a replacement player for Fazalhaq Farooqi
Full story: https://t.co/pVQsDrYsP9 pic.twitter.com/VWdYj4oFYj
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 20, 2025
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मोहम्मद रिझवान CPL मध्ये खेळताना दिसणार आहे. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू यापूर्वी CPL मध्ये खेळले आहेत. या हंगामात मोहम्मद आमिर, इमाद वसीम, नसीम शाह, उसामा मीर, अब्बास अफ्रिदी आणि सलमान इरशाद हेही खेळत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या केंद्रीय करारातील खेळाडूंना दोन परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे CPL ही रिझवानची दुसरी परदेशी लीग आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससोबतही करार केला आहे.
कमी स्ट्राइक रेटच्या समस्येमुळे रिझवानला पाकिस्तानच्या टी२० संघातून वगळण्यात आल्याचे मानले जाते. त्याने पाकिस्तानसाठी १०६ टी-२० सामन्यांमध्ये ९३ डावांत १ शतक आणि ३० अर्धशतकांसह ३,४१४ धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट १२५.३८ एवढा आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून रिझवान कधी मैदानात उतरेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पाकिस्तान संघातून वगळल्यामुळे त्याचा परदेशी लीग खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.