फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामीचे संघामध्ये पुनरागमन : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला २०२३ च्या विश्वचषकामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती त्यानंतर त्याच्या पायाची सर्जरी झाल्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मोहम्मद शामीच्या पुनरागमनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. विश्वचषक २०२३ च्या फायनलपासून तो सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयसीसीच्या या स्पर्धेतही तो दुखापतीसह खेळला होता. स्पर्धा संपल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, पण त्याच्या फिटनेसबाबत समस्या कायम होत्या.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत मोहम्मद शामी संघामध्ये खेळणार असा चाहत्यांनी अंदाज लावला होता. त्याआधी त्याने काही देशांतर्गत सामने खेळले होते आणि त्यामध्ये त्याने कमालीची कामगिरी देखील केली आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताला त्याची उणीव भासली. पण आता भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण मोहम्मद शामी इंग्लंडविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो आणि या मालिकेत चांगली कामगिरी करून तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले स्थान पक्के करू शकतो.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची वैद्यकीय टीम शामीवर बारीक नजर ठेवून आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या गुडघ्याला थोडी सूज आली होती, त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. सध्या, तो बंगालच्या विजय हजारे ट्रॉफी मोहिमेचा भाग आहे आणि गुरुवारी हरियाणाविरुद्ध उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. अहवालात म्हटले आहे की एनसीएचा किमान एक फिजिओ किंवा ट्रेनर त्याच्यासोबत आहे. बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांनी बडोद्यात विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांना उपस्थित राहून शमीच्या कामगिरीची दखल घेणे अपेक्षित आहे.
असे म्हटले जात आहे की त्याच्या गोलंदाजीवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही आणि त्याच्या गुडघ्यातही कोणतीही मोठी समस्या नाही. शामीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी एनसीएकडून ग्रीन सिग्नल लागेल. शमीशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही एनसीएच्या अहवालाची वाट पाहत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या बुमराहला सिडनीतील अंतिम कसोटीत पाठीला दुखापत झाली होती. शामीप्रमाणे त्यालाही संघात पुनरागमन करण्यासाठी एनसीएची परवानगी लागेल.
सोशल मीडियावर मोहम्मद शामीने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने लिहिले आहे की, अचूकता, वेग आणि उत्कटता, सर्व जगाला टेकण्यासाठी तयार आहे. यावरून तो पुन्हा भारतीय संघामध्ये आगामी मालिकेमध्ये परतणार असा अंदाज क्रिकेट चाहते लावत आहेत.
Precision, Pace, and Passion, All Set to Take on the World! 🌍💪 #Shami #TeamIndia pic.twitter.com/gIEfJidChX
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) January 7, 2025