मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
ICC Men’s Player of the Month nominees for August 2025: आयसीसीकडून ऑगस्ट महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये भारताचा मोहम्मद सिराजची वर्णी लागली आहे. त्यासोबतच न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा जेडेन सील्स यांचा देखील यामध्ये समावेश आहे. आयसीसीने ऑगस्ट महिन्यासाठी ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारासाठी या खेळाडूंची नावे पुढे करण्यात आली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला आयसीसीने नामांकन दिले आहे. मोहम्मद सिराजने इंग्लंडदौऱ्यावर पाच सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने खेळले आणि २३ विकेट्स देखील घेतल्या. सिराजने पाचही कसोटी सामन्यांमध्ये एकूण १८५.३ षटके गोलंदाजी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर संघाने मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडू Marcus Stoinis ची नवीन इनिंग सुरू! जोडीदार सारा झारनुचसोबतच्या प्रेमाची दिली कबुली
आयसीसीकडून त्यांच्या वेबसाइटवर लिहिण्यात आले की, “मोहम्मद सिराज ऑगस्टमध्ये फक्त एकच सामना खेळला होता, परंतु त्या सामन्यात त्याची शानदार गोलंदाजी त्याला नामांकित करण्यासाठी पुरेशी ठरली आहे. ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात सिराजने २१.११ च्या सरासरीने ९ बळी घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती.
आयसीसीने पुढे लिहिले आहे की, मालिकेतील पहिले चार सामने खेळून देखील, त्याने अंतिम सामन्याच्या दोन डावांमध्ये ४६ पेक्षा जास्त षटके टाकली आहेत. या दरम्यान, त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात ५ असे एकूण ९ बळी टिपले. दुसऱ्या डावात त्याच्या शानदार स्पेलमुळे भारताला विजय मिळवण्यात यश आले आणि मालिकेत २-२ अशी बरोबरी साधता आली. त्याच्या या सामन्यात शानदार कामगिरीसाठी सिराजला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
झिम्बाब्वेमधील कसोटी मालिकेतील विजयादरम्यान हेन्रीच्या शानदार कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले आहे. या गोलंदाजाने या मालिकेत १६ बळी टिपले आहेत. हेन्रीने पहिल्या कसोटीत दोन्ही डाव मिळून ९ विकेट्स आणि दुसऱ्या कसोटीत दोन्ही डाव मिळून ७ विकेट्स घेऊन आपल्या संघाला २-० असा विजय मिळवून देण्यात मोठी भूममीका बजावली होती.
हेही वाचा : PAK vs AFG : आशिया कपपुर्वी अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! अंतिम सामन्यात पाकिस्तानने तोडले लचके..
वेस्ट इंडिजच्या सील्सच्या शानदार कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने ३४ वर्षांत पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. सील्सने या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत. शेवटच्या सामन्यात त्याने १८ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामुळे २९५ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला फक्त ९२ धावांवर गारद केले होते.