पाकिस्तानी संघ(फोटो-सोशल मीडिया)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक निवेदन जारी करण्यात आले, यामध्ये एसीसीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केलेले वर्तन हे खेळाच्या भावनेनुसार नसल्याचे वर्णन त्यामध्ये करण्यात आले आहे. पीसीबीने तक्रार केली की ते खेळ भावनेविरुद्ध असून दोन्ही संघांमधील तणाव वाढवणारे आहे.
पीसीबी व्यवस्थापक नेमकं काय म्हणाले?
पीसीबी संघ व्यवस्थापक नवीद चीमा यांच्याकडूनही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. खेळाच्या भावनेनुसार त्याचा विचार केलेला दिसत नाही. त्यांक्याकडून सांगण्यात आले की, या घटनेच्या निषेधार्थ, आम्ही आमच्या कर्णधाराला सामन्यानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाला पाठवले नाही.
वास्तवात सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी देखील हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. तसेच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांच्याशी देखील बोलला नाही. हे देखील पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला आवडलेले नाही आणि सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन करण्याचे टाळल्यानंतर सलमानला सामन्यानंतरच्या सादरीकरणासाठी पाठवण्यात आले नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टॉस दरम्यान घडलेल्या एका घटनेवर देखील आक्षेप घेतला आहे. बोर्डाने म्हटले आहे की मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टकडून पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांना भारतीय कर्णधारासोबत हस्तांदोलन न करण्याची सूचना करण्यात आली होती. याबाबत पीसीबीकडून औपचारिक निषेध नोंदवण्यात आला आहे, ही सूचना खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे त्यात म्हटले आहे.
पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी म्हटले की, आम्हाला हस्तांदोलन करायचे होते, परंतु भारतीय संघाकडून तसे करण्यात आले नाही. याबद्दल आम्ही निराश आहोत. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याबद्दल आम्ही आधीच निराश आहोत, परंतु आम्हाला हस्तांदोलन करायचे होते.






