सुरकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav comments on the India-Pakistan match : टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणसंग्रामाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे सह-यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नियोजित आहे. परंतु, पाकिस्तानकडून आधीच या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने याबाबत आपले मौन सोडले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गुरुवारी स्पष्ट केले की, पाकिस्तानने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या नियोजित सामन्यासाठी कोलंबोला जाणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी भारताचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानसोबत सामना होणार आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला सामन्यात सहभागी न होण्याचे निर्देश दिले आहेत. बांगलादेशकडून भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला स्पर्धेतस्थान देण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेपूर्वी कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले मत मांडले. तो म्हणाले की, “मला वाटते की त्यांचा निर्णय माझ्या नियंत्रणात नाही. मी त्यांचे निर्णय घेऊ शकलो असतो, पण तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही आशिया कपमध्ये तीन वेळा त्यांच्याविरुद्ध खेळलो आहोत आणि आम्हाला अनुभव आहे.” सूर्या पुढे असा देखील म्हणाला की, “आमची विचारसरणी स्पष्ट आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिलेला नाही. त्यांच्याकडून नकार देण्यात आला आहे. आयसीसीने वेळापत्रक अंतिम केले आहे, आमचे विमान तिकिटे बुक झाली आहेत आणि आम्ही कोलंबोला जात आहोत.”
भारतीय संघाच्या योजना शेअर करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “संघाने चर्चा केली आहे की आम्ही ७ फेब्रुवारी रोजी सामना खेळू आणि नंतर कोलंबोला जाऊ. आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगले क्रिकेट खेळलेलो आहोत. सामना तटस्थ ठिकाणी आहे आणि जर संधी मिळाली तर आम्ही खेळू. पाकिस्तानी खेळाडूंसाठी देखील हा एक कठीण निर्णय आहे.”
भारताचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील वेळापत्रक टी-२० विश्वचषक २०२६ चे भारत आणि श्रीलंका सह-यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध सामना होणार आहे. वेळापत्रकानुसार, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे, परंतु हा सामना सध्या अनिश्चित अशा परिस्थितिमध्ये आहे. पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला भारताविरुद्ध हा सामना खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळेल. भारत भारताबाहेर फक्त एकच सामना खेळणार आहे.






