रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
Madhya Pradesh vs Punjab Ranji Trophy 2025 Match : रणजी ट्रॉफी २०२५ चा हंगामाला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशचा कर्णधार असलेल्या रजत पाटीदारने या हंगामाची सुरवात दिमाखात केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. रजत पाटीदारने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावून मोठी डरकाळी फोडली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रजत पाटीदारने त्याच्या डावात एक देखील षटकार ठोकला नाही. त्याने त्याच्या खेळीमध्ये काही आश्चर्यकारक शॉट्स मारले आहेत आणि 26 चौकारांच्या मदतीने त्याने द्विशतकाला गवसणी घातली आहे.
हेही वाचा : IND VS AUS : “जर फिट असता, तर संघात…”, मोहम्मद शमीच्या आरोपांवर अजित आगरकर बरसले..
इंदूरमधील एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कूल ग्राउंडवर पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रजत पाटीदारने शतक झळकावले, पण तो यावरच थांबला नाही. तर त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले द्विशतक देखील झळकावले. पाटीदारची खेळी देखील खास राहिली आहे कारण त्याने त्याच्या बहुतेक धावा टेलएंडर्ससोबत भागीदारीत रचत केल्या आहेत.
मागील हंगामात इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक सुरुवातीनंतर रजत पाटीदारला भारतीय कसोटी संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर, गेल्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या सुरुवातीपासूनच पाटीदारने चमकदार कामगिरी केली आहे. पाटीदार मध्य प्रदेशचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता, त्याने ४८.०९ च्या सरासरीने ५२९ धावा फटकावल्या होत्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकं लगावली होती. तसेच त्याने मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत देखील पोहचवले.
आरसाबीने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल जेतेपद देखील आपल्या नावावर केले. तसेच त्याने सप्टेंबरमध्ये बेंगळुरू येथे झालेल्या दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेत सेंट्रल झोनचे नेतृत्व करताना, पाटीदारने सलग चार अर्धशतके झळकावली होती, ज्यामध्ये क्वार्टर फायनल आणि फायनलमध्ये दोन शतकांचा समावेश होता. दक्षिण झोनविरुद्धच्या अंतिम सामन्यात, रजत पाटीदारने पहिल्या डावात शतक झळकावले आणि सेंट्रल झोनला १० वर्षांनी दुलीप ट्रॉफी जिंकण्यात मोठी भूमिका बाजवली.
रजत पाटीदारच्या फॉर्ममध्ये चांगले सातत्य आहे, तो शानदार कामगिरी देखील करत आहे, परंतु त्याला अद्याप भारत अ संघात स्थान मिळालेले नाही. आता रणजी ट्रॉफीमधील द्विशतकानंतर, बीसीसीआय निवडकर्ते त्याचा विचार करून दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्याची शक्यता आहे.