आर अश्विन आणि एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
नुकतीच संजू सॅमसनकडून राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला आयपीएल २०२६ पूर्वी आपल्याला सोडण्याची विनंती करण्यात आली होती. आता संजू सॅमसननंतर चेन्नई सुपर किंगचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने देखील सीएसके संघ सोडण्याचा विचार केला आहे. रविचंद्रन अश्विन आयपीएल २०२६ पूर्वी चेन्नई सुपर किंग्जपासून वेगळा होऊ शकतो. भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाजाकडून सीएसके फ्रँचायझी सोडण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. अश्विनची एखाद्या संघातील खेळाडूशी देवाणघेवाण होऊ शकते अथवा त्याला लिलावासाठी सोडण्यात येऊ शकते.
क्रिकबझच्या अहवालानुसार, असे म्हटले गेले आहे की, “अश्विनने सीएसके सोडण्याच्या निर्णयाचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु लवकरच अश्विन सीएसके अकादमीच्या संचालकपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तो गेल्या एक वर्षापासून या पदावर असून जर तो इतर कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील झाला तर त्याच्याविरुद्ध हितसंबंधांचा संघर्षाचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे.”
त्याच वेळी, अहवालात पुढे असे देखील म्हटले आहे की, सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अनुभवी माजी कर्णधार एमएस धोनी यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमध्ये संघाच्या योजनांवर चर्चा करण्यात येत आहे. अश्विनला दुसऱ्या संघात विकले जाईल की लिलावासाठी सोडण्यात येईल हे देखील अद्याप स्पष्ट नाही. मागील वर्षीच्या मेगा लिलावात अश्विनचा सीएसकेच्या संघात समावेश केला गेला होता.
हेही वाचा : PAK vs WI: बाबर आझमला विक्रमांची नामी संधी! दोन शतके लगावाताच बनेल पाकिस्तान क्रिकेटचा बेताश बादशाह
अश्विन एका दशकानंतर सीएसकेमध्ये ९.७५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत परतला होता . तथापि, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही आणि नऊ सामन्यांमध्ये ४०.४३ च्या सरासरीने केवळ ७ बळीच त्याला मिळवता आले होते. सीएसकेच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या सततच्या अकार्यक्षमतेबद्दल शंका निर्माण होत गेल्या.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनने आता राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे. संजू सॅमसनकडून राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला आयपीएल २०२६ पूर्वी आपल्याला सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. संजू सॅमसनने व्यवस्थापनाला त्याची देवाणघेवाण करण्यास किंवा त्याला सोडण्याची विनंती केली आहे. क्रिकबझच्या एका अहवालानुसार, संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनात बरेच मतभेद निर्माण झाले आहेत. परिस्थिती इतकी टोकाला गेली आहे की, संघाचा कर्णधार सॅमसनकडून स्वतःला दुसऱ्या संघात स्थानांतरित करण्याची किंवा त्याला लिलावात ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.