बेंगलुरु संघाच्या विजयानंतर इचलकरंजीत हुल्लडबाजी(फोटो-सोशल मीडिया)
इचलकरंजी : आयपीएल चषक विजेत्या बेंगलुरु संघाच्या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत साजरा केल्या गेलेल्या जल्लाेषाला गालबाेट लागले. काॅ. मलाबादे चाैकात मध्यरात्रीच्या सुमारास जल्लाेषासह हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी पाेलिसांना साैम्य लाठीमार करावा लागला. तर काही संतप्त युवकांकडून पाेलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. तसेच दगडफफेकीत पाेलिस गाडीच्या काचा फूटून नुकसान झाले. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला हाेता.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बेंगलुरू संघाने विजेतेपद मिळवल्यानंतर तरुणांचे जथ्थे जल्लाेष करत भागाभागातून माेटरसायकलवरून तसेच चालत माेठ्या संख्येने काॅ. मलाबादे चाैकात जमा झाले. जल्लाेष सुरू असताना या जल्लाेषाचे काही वेळानंतर हुल्लडबाजीत रुपांतर हाेऊ लागले. मध्यरात्री 12 नंतर काही अतिउत्साही युवकांना पाेलिसांनी साैम्य लाठीमार करत पांगवण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही तरुण आणखी जाेराने आरडाओरडा करु लागले.
याच दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांकडून पाेलिस गाडीवर दगड मारण्यात आला. युवकांना हटकले तरी ते जात नव्हते. यावेळी काही युवक जल्लाेष सुरूच ठेवणार असे सांगत पाेलिसांच्या अंगावर धावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पाेलिसांनी जादा कुमक मागवून युवकांना पांगवले.
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिले आयपीएल विजेतपद पटकावले. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच चाहत्यांचा उत्साह वाढला आणि यामध्ये गर्दी अनियंत्रित झाली. परिणामी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारो चाहते उपस्थित होते. एम. चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता ५० हजार प्रेक्षकांची असून अशा परिस्थितीत चाहत्यांची संख्या वाढत होती. ज्यामुळे चाहते जबरदस्तीने स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. काही चाहते तर झाडावर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील दिसून आले.