विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs SRH : आयपीएल २०२५ चा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान अनेक सामन्यात खेळाडू वेगवेगळे विक्रम रचत आहेत. नुकताच रोहित शर्माने काल झालेल्या हैद्राबादविरुद्ध षटकार लगावत मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू धडाकेबाज फलंदाज आणि रन मशीन विराट कोहली देखील चांगलाच फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने या हंगामात आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याने सलामीवीर म्हणून संघाला चांगली सुरुवात देखील करून दिली आहे. यामुळेच आरसीबी संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे या हंगामात आरसीबीला प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघांपैकी एक मानले जाता आहे. संघाने ८ पैकी ५ सामने जिंकले असून १० गुणांसह, आरसीबी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म बघता, तो येत्या काळात अनेक विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. तो एक विक्रम मोडीत काढण्याच्या उंबरठ्यावर आहे. माजी अनुभवी सलामीवीर शिखर धवनचा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा महान विक्रम तो मोडू शकतो.
हेही वाचा : MI vs SRH : Rohit Sharma चा मुंबई इंडियन्ससाठी ‘बिग शो’, रचला मोठा इतिहास; किरॉन पोलार्डलाही पछाडले..
शिखर धवनने आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळताना महत्वाचे योगदान दिले आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये २२२ सामन्यांपैकी २२१ डावात ७६८ चौकार लगावले आहे. विराट कोहलीने २६० सामन्यांपैकी २५२ डावात ७३२ चौकार मारले आहेत. शिखर धवनचा हा महान विक्रम मोडण्यापासून विराट कोहली केवळ ३७ चौकारच दूर आहे. विराट कोहलीनंतर तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नरचे नाव आहे. त्याने आयपीएलमध्ये ६६३ चौकार लगावले आहेत. यासाठी त्याने १८४ सामन्यांपैकी १८४ डावांचा सामना केला. डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या या हंगामात खेळत नाही.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा चौकार मारण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत ६१७ चौकार मारले आहेत. यासाठी त्याने २६० डाव खेळले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर सुरेश रैना आहे, ज्याने ५०६ चौकार मारले आहेत. यासाठी त्याने १९३ सामन्यांच्या १७९ डाव घेतले आहेत. या हंगामात विराट कोहलीचा फॉर्मबद्दल सांगायचे झाले तर तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आहे. विराट कोहली ८ सामन्यांच्या ८ डावात ३२२ धावा करून आठव्या क्रमांकावर विराजमान आहे.