पंजाब किंग्सकडून झालेल्या पराभवानंतर टॉम मूडी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘आम्ही या संपूर्ण हंगामातील कामगिरीवर शांत डोक्याने विचार करू. आम्ही आमच्या स्तरानुसार कामगिरी केली नाही. भविष्यात संघाचे नेतृत्व कसे असेल याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. असे दिसते की आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’ यावरून हे स्पष्ट होते की एलएसजी व्यवस्थापन आता केवळ संघाच्या रचनेवरच नव्हे, तर कर्णधारपदावरही एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
‘कर्णधारपदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, पंतसाठी हा हंगाम निश्चितच आव्हानात्मक होता आणि ते निकालांमध्ये दिसून येत आहे. या दबावाचा त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीवर परिणाम होत आहे का, याचा विचार करणे महत्वाचे आहे. मला माहित आहे की हा हंगाम आमच्यासाठी कठीण होता, पण आम्ही त्यावर सखोल विचार करू, वेळ घेऊ आणि प्रत्येक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करु.’ असे टॉम मूडी यांनी सांगितले.
ऋषभ पंतकडून आधीच भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. पंत आता लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपदही गमावू शकतो. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर, कर्णदारपदाची धुरा त्याच्या हाती सोपवण्यात आली होती, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्स सलग दोन वर्षे प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. आयपीएल २०२५ मध्ये, पंतने पहिल्यांदा लखनौचे कर्णधारपद भूषवले होते. तेव्हा संघ सातव्या स्थानावर राहिला होता. पंतच्या कर्णधारपदाखाली, फ्रँचायझीने दोन हंगामात २८ पैकी केवळ १० सामने जिंकले.
आयपीएल २०२६ मध्ये लखनौकडून खेळताना पंतने १४ सामन्यांमध्ये १३८.०५ च्या सरासरी स्ट्राइक रेटने केवळ ३१२ धावा केल्या. या काळात त्याने फक्त एकदाच ५० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल २०२५ मध्ये पंतची कामगिरी त्याहूनही खराब होती. त्या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये केवळ २६९ धावा केल्या. वृत्तानुसार, यामुळेच त्याचे संघातील स्थान आणि कर्णधारपद दोन्ही धोक्यात आले असून टीम मॅनेजमेंट कर्णधारपदावरुन पंतची हकालपट्टी करु शकते.
IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…






