PBKS vs RCB : गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. ज्यामध्ये पंजाबला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोरदार कामगिरी केली आणि पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाब संघ १०१ धावांवर गारद झाला. प्रत्युउत्तरात आरसीबीने सलामीवीर फील सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरवार आरसीबीने ११ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला. या पराभवामुळे पंजाब संघाला अंतिम फेरीत जाता आले नाही. तथापि, संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. यावर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.
पंजाब किंग्जसाठी स्पर्धा अद्याप संपलेली नाही. तरी संघाला अंतिम फेरीत पोहोचणे कठीण झाले आहे. पंजाब किंग्ज अजून देखील क्वालिफायर २ सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.
आरसीबीविरुद्धच्या पराभवावर श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, त्यांनी निश्चितच लढाई गमावली असली तरी, युद्ध नाही. क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
आरसीबीविरुद्धच्या ८ विकेटने झालेल्या दारुण पराभवानंतर, श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सादरीकरण समारंभात सांगितले की, “हा दिवस विसरण्यासारखा नक्कीच नाही, पण आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागणारा आहे. आपण (पहिल्या डावात) खूप विकेट जाऊ दिल्या. मागे जाऊन अभ्यास करण्यासारखे बरेच काही शिल्लक आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला माझ्या निर्णयांवर शंका नाही. आम्ही जे काही नियोजन केले होते, मैदानाबाहेर जे काही केले, ते मला वाटते की ते योग्य असेच होते. यह फक्त आम्हाला मैदानावर अंमलात आणता आले नाही.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “गोलंदाजांना देखील दोष देता येणार नाही, कारण बचाव करण्यासाठी असणारी धावसंख्या कमी होती. आम्हाला आमच्या फलंदाजीवर काम करावे लागणार आहे. विशेषतः या विकेटवर. आम्ही येथे खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये काही वेगळी अशी उसळी होती. आम्ही अशी कारणे आता देऊ शकत नाही, कारण आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत आणि आम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते. त्यानुसार आम्हाला कामगिरी करावी लागते. आम्ही लढाई हरलो आहोत, पण युद्ध नाही.” असे श्रेयस म्हणाला.