शुभमन गिल(सोशल मीडिया)
Indian Test captain Shubman Gill will create history : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला अडीच दिवसात पराभूत केले होते. आता या मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात संघाचा तरुण कर्णधार शुभमन गिलला इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून, शुभमन गिल सातत्याने खोऱ्याने धावा काढत असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला होता. आता, त्याच्याकडे सर्वात जलद १००० कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर जमा आहे. ज्यांनी कर्णधार म्हणून फक्त ११ डावात १००० धावा फटकावल्या होत्या. शुभमन गिल ब्रॅडमननंतर हा विक्रम करणारा पहिला फलंदाज बनण्याची शक्यता आहे. त्याने आधीच १० डावात ८०५ धावा केल्या असून त्याला आणखी १९६ धावा करायची गरज आहे. जर त्याने ही कामगिरी केली तर तो इतिहास रचेल. १,००० कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय कर्णधाराचा विक्रम सध्या सुनील गावस्कर यांच्या नावावर जमा आहे. ज्यांनी १५ डावात १००० धावांचा टप्पा गाठला आहे.
सध्याच्या फॉर्म पाहता, शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार अर्धशतक झळकावले होते. अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे मानली जाते. खेळपट्टी लहान आणि वेगवान असल्याने चौकार मारणे सोपे होते. त्यामुळे, हा सामना गिलसाठी विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर
शुभमन गिलची क्रिकेट कारकिर्द
शुभमन गिलने भारतासाठी ३८ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने ४१.४९ च्या सरासरीने २,६९७ धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याने नऊ शतके आणि आठ अर्धशतके झळकवली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५५ सामन्यांमध्ये ५९.०४ च्या सरासरीने २,७५५ धावा केल्या आहेत, तर २८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ७०५ धावा काढल्या आहेत.