फोटो सौजन्य - CricUpdates सोशल मीडिया
नॅथन लायनचा पराक्रम : सध्या श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामान्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. आता सध्या या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने कमालीची कामगिरी आणि पराक्रम केला आहे. नॅथन लायन वयानुसार सुधारणा करत आहे आणि हे त्याच्या गोलंदाजीत स्पष्टपणे दिसून येते. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३७ वर्षीय लिऑनने तीन विकेट घेत इतिहास रचला.
आशियाई भूमीवर १५० बळी घेणारा तो पहिला परदेशी गोलंदाज ठरला. गॉलमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नॅथन लायनने ३० षटकांच्या स्पेलमध्ये पाच मेडनसह ७८ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. त्याने आपला निरोप सामना खेळत असलेल्या श्रीलंकेच्या सलामीवीर पथुम निस्सांका (११) आणि दिमुथ करुणारत्ने (३६) यांना बाद केले आणि त्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूज (१) ला तिसरी विकेट म्हणून बाद केले. अँजेलो मॅथ्यूजला बाद करताच लिऑनने ही कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफ-स्पिनर नॅथन लायनने आशियातील त्याच्या ३० व्या कसोटी सामन्यात १५० विकेट्स पूर्ण केल्या. याचा अर्थ त्याची सरासरी प्रति विकेट ३० चेंडू होती. आशियाई भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायन व्यतिरिक्त, दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्नने आशियामध्ये २५ कसोटी सामन्यात १२७ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी २१ कसोटी सामन्यांमध्ये ९८ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ३२ कसोटी सामन्यांमध्ये ९२ बळींसह चौथ्या स्थानावर आहे.
ज्या पद्धतीने गोष्टी सुरू आहेत त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आशिया खंडात कसोटी सामन्यात १५० बळी मिळवण्याची भावना एका रात्रीत मनातून विसरणे कठीण आहे. मी उपखंडातही कठीण काळाचा सामना केला आहे. पण १५० विकेट्स घेण्याची भावना खास आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि यजमान संघाला ९० षटकांत २२९/९ अशा धावसंख्येवर रोखले. लिऑन व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने तीन विकेट्स घेतल्या. मॅथ्यू कुहनेमनने दोन तर ट्रॅव्हिस हेडने एक विकेट घेतली.