फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, यासाठी पाकिस्तान आणि युएईला जोरदार तयारी सुरु आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे पण भारताचा संघ सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तान जाणार नाही, त्यामुळे स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. भारताचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. पण त्याआधी इंग्लंडमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
इंग्लंडच्या अनेक राजकारण्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याला विरोध केला. खरं तर, २०२१ मध्ये जेव्हा तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानात आपले राज्य सुरू केले तेव्हा तेथे महिला क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आयसीसीच्या नियमांनुसार, पुरुष क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांना महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन द्यावे लागते आणि त्यांचा स्वतःचा किमान एक संघ असला पाहिजे.
तथापि, अफगाणिस्तान महिला संघाला मैदानात उतरण्यास तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. यामुळे अफगाणिस्तान संघाला सतत विरोधाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने अनेक वेळा अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळण्यास नकार दिला आहे. गेल्या महिन्यात, ब्रिटिश खासदारांच्या एका गटाने इंग्लंडला २६ फेब्रुवारी रोजी लाहोर येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची विनंती केली होती. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेन्झी यांनीही याला पाठिंबा दिला.
जसप्रीत बुमराह Champions Trophy 2025 खेळणार नाही? हर्षित राणाच्या एकदिवसीय पदार्पणाने दिले संकेत
तथापि, ईसीबीचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी सांगितले की ते सरकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर सामना खेळवतील. त्यांनी असेही म्हटले की, अफगाणिस्तानच्या समस्या एकट्या क्रिकेट समुदायाला सोडवता येणार नाहीत.
“आम्ही ऐकले आहे की अनेक सामान्य अफगाण नागरिकांसाठी, त्यांच्या क्रिकेट संघाचा खेळ पाहणे हे मनोरंजनाच्या काही मोजक्या प्रकारांपैकी एक आहे. आम्ही सामना खेळणार आहोत याची आम्ही पुष्टी करू शकतो,” थॉम्पसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तालिबान म्हणतात की ते इस्लामिक कायद्याच्या आणि स्थानिक रीतिरिवाजांच्या त्यांच्या व्याख्येनुसार महिलांच्या हक्कांचा आदर करतात आणि हे अंतर्गत मुद्दे आहेत जे स्थानिक पातळीवर सोडवले पाहिजेत.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या ६ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीआधी तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमधील पहिला सामना झाला आहे. या पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लंडला ६८ चेंडू शिल्लक असताना ४ विकेट्सने पराभूत केले आहे. आता या विजयासह भारताच्या संघाकडे मालिकेमध्ये १-० अशी आघाडी आहे. या मालिकेचा दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बाराबती ओडिशा येथे रंगणार आहे तर तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आला आहे.