पंतप्रधान मोदींकडून भारतीय महिला संघाला जेवणाचे आमंत्रण(फोटो-सोशल मीडिया)
PM Modi invites women’s team for lunch : २ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाला पंतप्रधान कार्यालयाने खेळाडूंना ईमेलद्वारे जेवणाचे आमंत्रण पाठवण्यात आले असे संघातील एका खेळाडूच्या प्रशिक्षकाने सांगितले . आज, ४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवणाला उपस्थित राहणार आहे. संघ आधीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाला आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून भारतीय संघाने प्रथमच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला आहे. शेफाली वर्माने ८७ धावा आणि दोन विकेट घेत शानदार अष्टपैलू कामगिरी बाजवली.
अष्टपैलू दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात पाच विकेट घेतल्या आणि ५८ धावा करत शानदार कामगिरी केली. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला २४६ धावांवर रोखण्यात यश आले आहे. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी दीप्तीला “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून निवडण्यात आले.
दीप्ती शर्मा म्हणाली की संघ पंतप्रधान मोदींना एक खास भेट देणार आहे. ती म्हणाली, “आम्ही अद्याप जर्सी द्यायची की बॅट, हे ठरवलेले नाही, परंतु आम्ही नक्कीच काहीतरी खास देणार आहोत. ” संघ लवकरच या भेटवस्तूबाबतचा निर्णय होईल.
पंतप्रधान मोदींनी संघाचे अभिनंदन केले असून त्यांचे कौतुक देखील केले आहे. विश्वचषक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर संघाचे कौतुक केले आहे. कौतुक करताना त्यांनी लिहिले की , “अंतिम फेरीत भारतीय संघाची कामगिरी अद्भुत होती. त्यांची एकता, कौशल्य आणि आत्मविश्वासाने देशाला अभिमान वाटला आहे.”
हेही वाचा : ICC Ranking मध्ये मोठा उलटफेर! विश्वचषक जिंकूनही स्मृती मानधनाला मोठा झटका; लॉरा वोल्वार्ड्ट अव्वल स्थानी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला संघाच्या ऐतिहासिक विजयासाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनी सांगितले की, “संघाच्या धाडसाने आणि एकतेने देशाच्या अपेक्षा नवीन उंचीवर पोहचवले आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देश आनंदाच्या वातावरणात आहे. लोक याला भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. इथे लक्षात घेण्यासारखे आहे की, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच आयसीसी विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.






