वर्ल्ड कप २०२३ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल : वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये भारताची सुरुवात काही खास झाली नाही. उपांत्य फेरीत भारताचे हिरो ठरलेले संघाचे तीन स्टार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. या तीन फलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. तथापि, कर्णधार रोहित शर्माने ४७ धावांची खेळी खेळली जी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही खेळली होती. पण श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल अतिशय स्वस्तात परतले. आता विराट कोहली मैदानावर दमदार खेळी करेल अशी आशा आहे.
गिलची विकेट पडल्यानंतर विराट कोहली क्रीझवर आला. त्यानंतर श्रेयस अय्यरची विकेट पडल्यानंतर केएल राहुल क्रीजवर आला. वृत्त लिहिपर्यंत विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर उपस्थित होते. विश्वचषक २०२३ च्या पहिल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने ८५ आणि केएल राहुलने ९७* धावा केल्या. अशा परिस्थितीत दोन्ही खेळाडूंकडून पुन्हा एकदा तशीच अपेक्षा असेल.
सलामीला आलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा जोडल्या होत्या. अंतिम सामन्यात हिटमॅनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. १० व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला. मात्र उपांत्य फेरीत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची नाबाद खेळी करणारा शुभमन गिल अंतिम फेरीत केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल डावाच्या ५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
उपांत्य फेरीत भारतासाठी शानदार शतक झळकावणारा श्रेयस अय्यर अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ४ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अय्यरने ७० चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. पण आज अंतिम सामन्यात अय्यर ११ व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सचा बळी ठरला. कर्णधार रोहित शर्मा याच्या दोन षटकांपूर्वी बाद झाला.