दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर लिझेल लीला दंड ठोठावण्यात आला(फोटो-सोशल मीडिया)
Lizelle Lee fined in WPL 2026 : सध्या महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत १३ सामने खेळवण्यात आले आहेत. दरम्यान, या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला चांगलाच दणका बसला आहे. १३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर देखील दिल्लीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर लिझेल लीला तिच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर लिझेल लीने BCA स्टेडियमवर ४६ धावा काढल्या होत्या. परंतु, या सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला गेला आहे आणि लीला एक डिमेरिट पॉइंट देखील दिला गेला आहे.
महिला प्रीमियर लीगच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “लीने आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे. लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.” विकेटकीपर-फलंदाज लिझेल लीने तिचा लेव्हल १ गुन्हा आणि दंड स्वीकारला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीदरम्यान हा सर्व प्रकार घडला. ली उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून येत होती, तिने काही चेंडू सीमापार फटकावले. तथापि, ११ व्या षटकात तिसऱ्या पंचाने रिव्ह्यू केल्यानंतर तिला स्टंप बाद देण्यात आले. लीने २८ चेंडूत ४६ धावा केल्या. या दरम्यान, १ षटकार आणि ७ चौकार लगावले. ती तिच्या अर्धशतकापासून फक्त ४ धावा कमी होत्या. रिप्लेमध्ये असे दिसून आले की विकेटकीपर राहिरा फिरदौसने बेल्स उडवल्या तेव्हा लीची बॅट थोड्या वेळासाठी क्रीजच्या वर गेली होती, परंतु ली पंचांच्या निर्णयावर निराश झाल्याचे दिसले.
पाच मिनिटांच्या ऑन-स्क्रीन रिव्ह्यूनंतर लीचा बाद होणे निश्चित झाले असताना तिने तेव्हा ऑन-फिल्ड पंच वृंदा राठीशी वाद घालायला सुरुवात केली. या कृतीमुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले. दक्षिण आफ्रिकेची खेळाडू लिझेल लीला WPL लिलावात तिच्या ₹३० लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी करण्यात आले आहे.






