मॅट हेन्रीने झिम्बाब्वेविरुद्ध रचला इतिहास (फोटो-सोशल मीडिया)
ZIM vs NZ : न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी किवी संघाने आपला जलवा दाखवून दिला आहे. या सामन्यात न्यूझीलंड यजमान झिम्बाब्वे संघावर वर्चस्व गाजवताना दिसून येत होता. त्यामुळेच त्यांनी सामन्यावर चांगलीच पकड जमवली आहे. किवी संघासाठी मॅट हेन्री आणि नॅथन स्मिथ यांच्या शानदार कामगारीने संपूर्ण झिम्बाब्वेला फक्त १४९ धावांतच गारद केले आहे. यासह, ३३ वर्षीय हेन्रीने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी डावात सर्वोत्तम कामगिरी करत इतिहास रचला आहे.
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वे संघाला पहिल्याच दिवशी १४९ धावांवर गुंडाळले आहे. मॅट हेन्रीने ६ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
मॅट हेन्रीने १५.३ षटके गोलंदाजी करत ३९ धावांत सहा बळी टिपले. त्याच्या आधी, ही कामगिरी माजी किवी वेगवान गोलंदाज नील वॅग्नरच्या नावावर जमा होती. ज्याने नऊ वर्षांपूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर एका कसोटी डावात ४१ धावांत सहा विकेट्स मिळवल्या होत्या. क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकूण झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यजमान संघासाठी हा निर्णय मात्र चांगलाच अंगाशी आला.
झिम्बाब्वेने ब्रायन बेनेट (६) ला केवळ १० धावांवर गमावले होते. त्यानंतर विकेट्सचीन झडी लागली. ६९ धावांपर्यंत संघाने ५ गडी गमावले होते. बेन करन १३, शॉन विल्यम्स २, निक वेल्च २७ आणि सिकंदर रझा २ धावा करून माघारी परतला होता. येथून कर्णधार क्रेग इर्विनने तफाडझ्वा सिगासोबत सहाव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, इर्विन ६८ चेंडूत २७ धावा करून बाद झाला, तर तफाडझ्वाने ७८ चेंडूंचा सामना करत संघाच्या खात्यात ३० धावा जोडल्या. अखेर झिम्बाब्वे संघ ६०.३ षटकांत १४९ धावांवरच सर्वबाद झाला.
न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने सहा विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडले. तर नाथन स्मिथने १४ षटकांत २० धावा देऊन तीन विकेट्स मिळवल्या. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत २६ षटकांत खेळत एकही विकेट न गमावता ९२ धावा जोडल्या आहेत.
हेही वाचा : IND vs ENG: ओव्हल कसोटीला सुरवात; गंभीर-गिलला सतावणार ‘ती’ गोष्ट; वाचा सविस्तर
न्यूझीलंडकडून पहिल्या डावात विल यंगने ६९ चेंडूत चार चौकारांसह ४१ धावा, तर डेव्हॉन कॉनवेने ८७ चेंडूत ८ चौकारांसह ५१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड सध्या झिम्बाब्वेपेक्षा फक्त ५७ धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन्ही सामने बुलावायो येथे खेळले जाणार आहेत.