फोटो सौजन्य - Social Media
पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आज अत्यावश्यक ठरत आहे. बातमीची पडताळणी, माहिती मिळवण्याचा वेग आणि डिजिटल कामकाजातील अचूकता वाढवण्यासाठी एआय साधनांचा वापर वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यात अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, पत्रकारांना आधुनिक डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
त्याचबरोबर ‘रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात’ ‘एआय फॉर न्यूज’ हा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आला असून, त्यावर सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील पत्रकार कक्षात ११ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एआय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेत एआय तज्ज्ञ किशोर जशनानी यांनी पत्रकारितेसाठी आवश्यक असलेल्या प्रॉम्प्ट्सची रचना, ChatGPTचे पर्याय, फोटोवरून बातमी/व्हिडिओ तयार करण्याची पद्धत, न्यूज रिपोर्ट लिहिणे, तसेच ChatPDF सारख्या सहाय्यक टूल्सचा उपयोग अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण व तालुका पातळीवरील पत्रकारांनाही आधुनिक एआय साधनांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
“आजच्या डिजिटल युगात पत्रकारांवर बातमीच्या वेगाबरोबरच अचूकतेची मोठी जबाबदारी आहे. अशा वेळी एआय हे फक्त तांत्रिक साधन नसून, कामाला नवी धार देणारे माध्यम आहे. प्रत्येक पत्रकार सक्षम व्हावा आणि लोकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता यावेत, हाच या उपक्रमाचा खरा हेतू आहे,” असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, प्रशिक्षक लोमेश नारखेडे यांसह विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पत्रकार दीपक कैतके, संजय जोग आणि क्लारा लुईस यांनी कार्यशाळेबाबत आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भातुसे यांनी तर समन्वय खंडूराज गायकवाड यांनी केला.






