Airtel कडून पुन्हा नवं गिफ्ट! कंपनीने लाँच केली बीएनडी सर्व्हिस, ग्राहकांना कसा होणार फायदा? जाणून घ्या
एअरटेल त्यांच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी नेहमीच नवीन सर्विस लाँच करत असते. नुकतेच कंपनीने त्यांच्या ग्राहकांचे स्पॅम कॉल्सपासून संरक्षण व्हावं यासाठी एक सर्विस सुरु केली होती. यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन सर्विस सुरु केली आहे, ज्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्विसचं नाव बीएनडी असं आहे.
एअरटेल बिझनेसने उद्योगांसाठी डिझाइन केलेले म्हणजेच ‘बिझनेस नेम डिस्प्ले’ (बीएनडी) अखेर लाँच केले आहे. यामुळे आता व्यवसायांनी ग्राहकांना आउटगोइंग कॉल केला असताना ग्राहकांच्या मोबाइल स्क्रीनवर त्यांचे ब्रँड नाव दिसणार ज्यामुळे विश्वास जोपासला जाईल आणि ग्राहकांना योग्य व्यवसाय कॉल्स आणि स्पॅम यांच्यातील फरक कळण्यास मदत मिळेल. शिवाय या सेवेमुळे ग्राहकांचे स्पॅमपासून संरक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी भारतातील पहिले स्पॅमशी लढणारे फीचर लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने व्यवसाय कॉल्स आणि स्पॅम यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी एक नवीन सर्विस सुरु केली आहे. या उपक्रमांमुळे ग्राहक जास्त प्रमाणात जागरूक राहू लागलेले आहेत आणि त्यामुळे स्पॅम चिन्हांकित केलेल्या किंवा माहीत नसलेल्या क्रमांकावरून आलेल्या कॉल्सकडे अधिक लोकं लक्ष देत नाहीत. याचा चांगला परिणाम झाला आहे की स्पॅमपासून ग्राहकांची सुरक्षा वाढली आहे.
याचा वाईट परिणाम असा की ग्राहक अनेक नंबरकडे स्पॅम समजून लक्ष देत नाहीत. कारण ब्रँड्सकडून केल्या गेलेल्या कॉल्सना सुद्धा स्पॅम म्हणून चिन्हांकित केले जात आहे. परिणाम स्वरूप बँका, अन्न पोहचविणारे, कुरिअर पोहचविणारे, डॉक्टरांच्या महत्वपूर्ण अपॉइंटमेंटसाठी हॉस्पिटल इत्यादींकडून येणारे महत्वपूर्ण कॉल्स ग्राहक घेत नाहीत. “बिझनेस नेम डिस्प्ले” ने हे आव्हान सोडविले आहे आणि ग्राहकांना सर्व इनकमिंग कॉल्सच्या बाबतीत माहितीपूर्ण निर्णय घेऊ दिल्याने संबंधित परंतु सुरक्षित संवाद साधण्याचे वातावरण सुलभ झालेले आहे. हे कॉल्स ज्या कंपनीने केले आहेत त्या कंपनीचे नाव दर्शविले जाणार आहे. त्याबदल्यात, व्यवसाय त्यांच्या ग्राहकांना फसव्या कॉलर्सपासून संरक्षण देत असताना स्वतःचे नाव दर्शवू शकत आहेत.
शरत सिन्हा, संचालक आणि सीईओ, एअरटेल बिझनेस म्हणाले, “एअरटेलमध्ये आम्ही संवाद साधण्याचा एक असा अनुभव निर्माण करण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो जो प्रत्येकासाठी स्मार्ट, सुरक्षित आणि अधिक पारदर्शक आहे. “बिझनेस नेम डिस्प्ले” च्या माध्यमातून आम्ही व्यवसायांना विश्वास स्थापित करण्यात आणि प्रत्येक कॉलद्वारे स्वतःचे नाव दर्शविण्यास मदत करणार आहोत आणि त्याचबरोबर ग्राहकांशी संपर्क साधणाऱ्यांना जाणून घेण्याचा आत्मविश्वास देत आहोत. हे दोन्ही बाजूंसाठी संवाद अधिक वैयक्तिक, सुरक्षित आणि सुलभ बनविण्याबद्दल आहे.”
विविध क्षेत्रांतील 250 हून अधिक व्यवसायांसोबत हा उपाय यशस्वीपणे राबविला गेला आहे. या क्षेत्रांमध्ये बँकिंग, रिटेल, अन्न पोहचविणे, गतिशीलता, क्विक कॉमर्स, कुरिअर आणि लॉजिस्टिक्स सामील आहेत. या व्यवसायांमध्ये 1.5 मिलियन हून अधिक फोन क्रमांक गेल्या 30 दिवसांत वापरले गेले असून 12.8 मिलियन कॉल्स केले गेले आहेत.