ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या
दिवाळीच्या निमित्ताने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरु होता. या सेलमध्ये ग्राहकांना महागडे प्रोडक्ट्स देखील कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होते. म्हणजेच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये महागड्या प्रोडक्ट्सवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात होतं. त्यामुळे ग्राहकांची बचत देखील झाली याशिवाय त्यांना नवीन प्रोडक्ट्सची खरेदी करण्याची संधी देखील मिळाली. याशिवाय झेप्टो आणि स्विगीवर देखील फेस्टिवल ऑफर्स सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र काही प्लॅटफॉर्म असे देखील होते जिथे हिडन चार्जेस आकारून ग्राहकांची फसवणूक केली जात होती.
काही प्लॅटफॉर्म्सवर प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट उपलब्ध असल्याचे दाखवले जात होते. मात्र ग्राहक जेव्हा संबंधित प्रोडक्ट त्यांच्या कार्टमध्ये अॅड करून खरेदी करण्यासाठी क्लिक करत होते, तेव्हा हिडन फी अप्लाय करून त्या प्रोडक्टच्या खऱ्या किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात होते. यालाच ड्रिप प्राइसिंग स्कॅम असं म्हणतात. याबाबत अनेक ग्राहकांना त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तक्रार केली होती. आता सरकारने याची दखल घेतली असून कंपन्यांना याबाबत वार्निंग दिली आहे. तुम्ही देखील अशा एखाद्या स्कॅमचे शिकार झाला असाल तर त्याबाबत केवळ सोशल मीडियावर तक्रार करणं योग्य नाही. तुम्हाला या स्कॅमविरोधात रितसर तक्रार दाखल करावी लागणार आहे. या स्कॅमविरोधात कशा पद्धतीने तक्रार दाखल करावी, याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
असे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जे ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी डार्क पॅटर्नचा वापर करतात. यामध्ये सर्वात आधी कोणत्याही प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जातं. मात्र जेव्हा ग्राहक ते प्रोडक्ट ऑर्डर करतात तेव्हा त्यांना जास्तीचे पैसे भरावे लागतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला डिस्काऊंट आणि ऑफरनंतर एखादे स्मार्टवॉच 1,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असलेले दिसत आहे. मात्र जेव्हा ग्राहक हे स्मार्टवॉच त्यांच्या कार्टमध्ये अॅड करतात तेव्हा त्यांची किंमत प्रचंड वाढते. कारण तेव्हा कंपनी हिडन चार्जेज अप्लाय करते, ज्याची माहिती ग्राहकांना आधी दिली जात नाही. यालाच ड्रिप प्राइसिंग स्कॅम असं म्हटलं जातं.
जर तुम्ही देखील ड्रिप प्राइसिंग स्कॅमचे शिकार झाला असाल किंवा तुम्हाला देखील एखादे प्रोडक्ट खरेदी करताना जास्तीचे पैसे भरावे लागले आहेत का? तर तुम्ही देखील अगदी सोप्या पद्धतीने त्याविरोधात तक्रार दाखल करू शकणार आहात. अशा परिस्थितीत नॅशनल कंज्यूमर हेल्पलाइन तुमची मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी 1915 नंबरवर कॉल करून प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्मविरोधात तक्रार दाखल करावी लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन प्रकरणाची चौकशी करेल आणि तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारे, तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी ऑनलाइन खरेदी आणि ऑर्डरिंगचा अनुभव सुधारू शकता.






