Amazon-Flipkart सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, या टिप्स तुमच्यासाठी ठरणार महत्त्वाच्या! तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट
दिग्गज ई-कॉमर्स प्लेटफॉर्म, Amazon आणि Flipkart वर 2025 मधील मोठा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. Amazon वर Prime Day सेल आणि Flipkart वर GOAT सेल सुरु झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉपपासून अनेक गॅझेट्सवर भरगोस डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्स पाहून अनेक लोकं लगेचच सामान ऑर्डर करतात आणि ऑनलाईन पेमेंट देखील करतात. काहीवेळा असं करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
हल्ली स्कॅमर्स खोट्या वेबसाईट आणि स्किमद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. अशा अनेक घटना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टिंची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपल्या एका चुकीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या लोभापोटी तुम्ही एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, या टिप्स ऑनलाईन शॉपिंगवेळी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही महिन्यांत Amazon Prime Day सेलच्या नावाने अनेक खोट्या वेबसाईट सुरु करण्यात आल्या आहेत. स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी या वेबसाईट्स सुरु केल्या आहेत. तुम्ही जर या वेबासाईट्सवरून शॉपिंग केली तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेबसाईटवरून शॉपिंग करताना यूआरएल चेक करा. स्कॅमर्सनी तयार केलेली ही खोटी वेबसाईट Amazon सारखीच दिसते, त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटवरून शॉपिंग करताना त्याचा यूआरएल चेक करा.
असं देखील अनेकदा घडलं आहे की, काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आधी प्रोडक्टच्या किंमतीत मोठी वाढ करतात, आणि सेलदरम्यान या किंमती कमी करतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांना सेलमध्ये प्रोडक्ट कमी किंमतीत उपलब्ध झाले आहे. मात्र ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी कंपन्या हा खेळ खेळतात. त्यामुळे सेलमधून कोणतंही गॅझेट किंवा डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रथम गॅझेट किंवा डिव्हाईसची अधिकृत किंमत तपासावी. गॅझेट किंवा डिव्हाईसच्या किंमतीची तुलना केल्यानंतरच तुम्ही गॅझेट किंवा डिव्हाईसची ऑर्डर द्यावी.
अनेक वेळा यूजर्सना मूळ उत्पादनाऐवजी बॉक्समध्ये साबण किंवा इतर गोष्टी सापडल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही ऑनलाइन प्रोडक्ट ऑर्डर करत असाल तर ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडा. यासह, डिलिव्हरी बॉय प्रथम प्रोडक्ट उघडेल आणि तुम्हाला ते दाखवेल. त्यानंतरच तुम्हाला त्याच्यासोबत OTP शेअर करावा लागेल. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. तथापि, ओपन बॉक्स डिलिव्हरी फक्त महागड्या उत्पादनांवरच उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑर्डर करत असलेल्या उत्पादनात ही सुविधा उपलब्ध आहे की नाही हे तपासले पाहिजे.