Maharashtra Assembly Election 2024
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची तयारी सुरु झाली आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मात्र अद्याप अनेक मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी माहिती मिळाली नाही. अशा मतदारांसाठी आता नवी मुंबई पोलिसांनी लिंक आणि QR कोड लाँच केलं आहे. या QR कोड आणि लिंकच्या मतदीने मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी माहिती मिळणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नवी मुंबई पोलिसांनी मतदानाच्या दिवशी नवी मुंबईकरांच्या सोयीसाठी एक लिंक आणि QR कोड आणला आहे. नवी मुंबई पोलिसांनी लाँच केलेली लिंक आणि QR कोड मतदारांसाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे. नवी मुंबईतील मतदार ज्यांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही, ज्यांना पार्किंगच्या सुविधेबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे किंवा विशिष्ट केंद्रावरील गर्दीबद्दल जाणून घ्यायचं असेल, अशा सर्व मतदारांना आता फक्त एका क्लिकवर ही सर्व माहिती मिळू शकेल. (फोटो सौजन्य – pinterest)
नवी मुंबई पोलिसांनी लाँच केलेली ही लिंक फक्त ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या मतदारसंघांसाठी बनवली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि अधिक सोयीस्कर करण्याच्या प्रयत्नात नवी मुंबई पोलीस विभागाने वेबलिंक आणि क्यूआर कोड सुरू केला आहे. मतदार कोड स्कॅन करू शकतात किंवा त्यांच्या मतदान केंद्राबद्दल रिअल-टाइम डिटेल्स मिळविण्यासाठी लिंकला भेट देऊ शकतात.
पोलीस विभागाने टेक्नोलॉजीचा वापर करून मतदारांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस विभागाने स्वेच्छेने अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करतील अशी आशा आहे. अधिक माहितीसाठी, मतदार www.navimumbaipolice.gov.in/guide-to-polling या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात .
लिंक आणि क्यूआर कोड मतदारांना मतदान केंद्राचे रिअल टाइम अपडेट्स प्रदान करेल. ज्यामुळे रहिवाशांना गर्दीच्या आकारानुसार कधी जायचे हे ठरविण्यात मदत होणार आहे. प्रामुख्याने चार प्रकारची माहिती उपलब्ध असेल – बूथचे स्थान, गर्दीचा आकार, बूथवरील पार्किंगची सुविधा आणि फोन ठेवण्यासाठी लॉकरची उपलब्धता. सर्व बूथमध्ये लॉकरची सुविधा आहे आणि त्याची माहिती लिंकमध्ये देण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त (झोन I) पंकज डहाणे यांनी सांगितले.
लिंक किंवा क्यूआर कोड व्यक्तीला निवडणूक आयोगाच्या पेजवर घेऊन जाईल, जिथे त्यांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी महत्त्वाचे डिटेल्स मिळतील. याव्यतिरिक्त, बूथवरील निवडणूक अधिकारी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदारांच्या संख्येनुसार रिअल-टाइम डेटासह सिस्टम अपडेट करतील.
निवडणुकीसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सहाय्यक पोलीस आयुक्त अजय यांनी सांगितलं की, आम्हाला मतदान केंद्राची माहिती, गर्दीचा आकार आणि मतदारांची संख्या यासह इतर माहिती रहिवाशांसाठी एका बटणाच्या क्लिकवर सहज उपलब्ध व्हावी अशी आमची इच्छा होती आणि म्हणूनच हा पुढाकार घेण्यात आला. मतदारांना मतदान केंद्राच्या आवारात 100 मीटरच्या आत मोबाईल फोन आणण्यास मनाई करण्यात आली आहे.